वनांचे संवर्धन गरजेचे : खा.श्रीनिवास पाटील


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    वनांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा विकास करणे ही काळाची गरज आज बनली आहे. त्यामुळे वनांचे रक्षण करून व वन्यजीव वाचवली पाहिजेत. असे मत खा.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

     केंद्र सरकारच्या 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या उत्सवाचा भाग म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली वन विभागाकडून 'इंडिया फॉर टायगर्स ऑन व्हील्स’ या वाहन रॅलीचा खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कराड येथून शुभारंभ करण्यात आला. ही रॅली कराड येथून पुढे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व त्यानंतर काली टाइगर रिजर्व दांडेली, कर्नाटक येथे जाणार आहे. यादरम्यान वाघांच्या रक्षणासाठी व जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यानिमित्ताने स्व.यशवंतराव चव्हाण सभागृह, कराड येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खा.पाटील बोलत होते.

     खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, मागील शतकात वाघांची संख्या कमी झाल्याची टिप्पणी आहे. त्याचा परिणाम निसर्ग चक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. अमाप जंगलतोड झाल्याने वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व देखील नष्ट होत आहे. तसेच जंगल कमी झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळले असल्याने मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष वाढत चालला आहे. मानवाने निसर्ग चक्र बिघडवून नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण दिल्याचे बोलले जाते. हवामानातील बदल, वेळोवेळी होणारी अतिवृष्टी या घटनातून तसे दिसून येत आहे, या सर्वाला मानव कारणीभूत ठरत असून आपणच वनांचे रक्षण करून वन्यजीव वाचवले पाहिजेत. वनविभागाने शाळा, महाविद्यालयात वाघांचे रक्षण, वनांचे जतन करण्यासाठी वन चित्रकला, फिल्म व निसर्गरम्य सहली तसेच निसर्ग सानिध्यात विविध स्पर्धा घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी लाकूड न वापरता पर्यायी मार्गाकडे वळले पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कमी होईल. सातारा जिल्ह्यात वन विभागाने वनांच्या रक्षणासोबतच वन पर्यटनाला सुध्दा चालना दिली पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यातील रोजगार व लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कास, महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, जावळी, पाटण, कोयना यासारखी अनेक पर्यटनस्थळे सातारा जिल्ह्यात आहेत. पर्यटन वाढल्यास जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

   प्रारंभी स्वागत क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांनी केले. तर प्रास्ताविक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. याप्रसंगी कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे, सातारा जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहित, शिशुपाल पवार, अन्य मान्यवर व चांदोली, हेळवाक, ढेबेवाडी, कोयना, बामणोली या वनपरिक्षेत्र कार्यालयातून आलेले वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.