"ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरी" हा एक स्तुत्य उपक्रम : देवराजदादा पाटील

 


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व शिक्षक अपार मेहनत करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग, उपक्रम देखील राबवत आहेत.जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत,ते ह्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाहात यावेत. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात असूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन सर्वजण गुरुजन करत आहेत. असाच एक अभिनव उपक्रम "ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरी" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेघरवस्ती पाल तर्फे राबवण्यास सुरुवात करण्यात आली .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या उपक्रमाचे उदघाटन श्री. मल्हार मार्तंड देवस्थान चे प्रमुख मानकरी ,माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती-जि. प.सातारा, विद्यमान पंचायत समिती सदस्य,पं.स.कराड, श्री देवराज दादा पाटील यांच्या हस्ते व आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार प्राप्त केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हणमंत काटे  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बेघरवस्ती पाल चे सर्व शिक्षक, मान्यवर मंडळी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,विद्यार्थी प्रतिनिधी कु. प्रगती सचिन गोरे व कु.रुद्र विजय गोरे व त्यांचे पालक ,नातेवाईक, ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती होती .

      सदर कार्यक्रमात" फिरते ग्रंथालय" या नवीन उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर उपक्रमासाठी जाधववाडी पाटण,येथील शिक्षणप्रेमी,सौ.शशिकला शंकर पवार यांनी पुस्तके भेट दिली. तसेच कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उदात्त हेतूने काही कॉलेज विद्यार्थ्यांनी त्यांचा पॉकेटमनी वाचवून छोट्या दोस्तांना दिलेल्या वह्या-पेन यांची मदत त्यांची प्रतिनिधी कु. मंजिरी महामुनी हिने मान्यवरांच्या करवी विद्यार्थ्यांकडे सोपविली.

        सदर"ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरी"ह्या उपक्रमाचे श्री.देवराजदादा पाटील,सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी,पेंबर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हणमंत काटे  यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी व विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रयोग करण्यासाठी सर्व शिक्षकांना खूप-खूप शुभेच्छा दिल्या .

              यावेळी श्री.देवराज दादा पाटील यांचे स्वागत जि. प.प्रा.शाळा.बेघरवस्ती-पाल तर्फे करण्यात आले. पंचायत समिती कराड चा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल पेंबर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.हणमंत काटे साहेबांचा जि. प.प्रा.शाळा.बेघरवस्ती-पाल तर्फे सत्कार करण्यात आला.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .नांगरे सर यांनी केले. उपक्रमाची माहिती श्रीमती. पवार मॅडम यांनी दिली.तर कार्यक्रमाचा समारोप श्री.इंगळे सर यांनी केला.



                     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेघरवस्ती पालच्या मुख्याध्यापक श्रीमती. काळे सी. के. मॅडम,श्री.इंगळे एन. एस.सर,श्री.नांगरे एस.एम.सर, श्रीमती .पवार एस.व्ही.मॅडम यांनी व पालकांनी परिश्रम घेतले.