उद्योगलक्ष्मी दिवाळी मेळ्यास उदंड प्रतिसाद, श्रीनिवास पाटील फाउंडेशन व उमेदच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुककराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
      सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट व त्याअंतर्गत लघुउद्योग, गृहप्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पादन करणाऱ्या महिला उद्योजक भगिनींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उद्योगलक्ष्मी दिवाळी मेळा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळ्यास जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
    श्रीनिवास पाटील फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद सातारा जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यामाने सनबीम आयटी पार्क, गोडोली (सातारा) येथे हा दिवाळी मेळा भरवण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यातील 60 गावांमधील 60 हुन अधिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. त्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व पदार्थ मेळ्यातील खास आकर्षण ठरले. बचतगटांच्या स्टॉल्सनी नागरिकांचे लक्ष वेधून त्यांची मने देखील जिंकली. या मेळ्यात मान्यवरांसह आबालवृद्धांनी खरेदीचा आनंद घेतला. मेळ्याचे उद्घाटन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, प्रीसाईज उद्योग समूहाच्या उषा शिंदे, कपूर उद्योग समूहाच्या मनिषा कूपर, सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम सातारा जिल्हा भारत पोस्टच्या वरीष्ठ अधिक्षक अपराजिता मिर्धा व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडले. तर यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी खा.श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उमेद अभियानाच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, चाकोरीबद्ध संकल्पनेतून बाहेर पडून महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. येत्या काळात महिलांनी अधिकाधिक सशक्त व सक्षम झाले पाहिजे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेवले आहे. सैनिक बनूनही देशाच्या रक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये त्यांना संधी मिळत आहे. महिला केवळ आर्थिक सक्षम नाहीतर महत्त्वाच्या पदावर त्या जायला हव्यात.
   महिलांनी बचतगटांच्या सामाजिक चळवळीतून विकास साधला आहे. बचतगटांनी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुध्दा भरभक्कम स्थान निश्चित केले आहे. तर त्यातून समाजात स्थानिक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. महिलांनी नवनवीन संकल्पनांचा स्वयंरोजगार व व्यवसाय वाढीसाठी पुरेपूर वापर करावा.
शेखर सिंह म्हणाले, श्रीनिवास पाटील फाउंडेशन व उमेदने हा उपयुक्त असा उपक्रम राबवला आहे. यामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले, त्यांना प्रोत्साहन मिळाले. तसेच त्यांना मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा फायदा व्यवसाय वृद्धीसाठी होणार आहे.
    दरम्यान श्रीनिवास पाटील फाऊंडेशन यांचे मार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमातील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. यामध्ये डिजीटल कन्या सोशल मिडिया व सायबर जागृती स्पर्धा, ‘सातारा आईन्स्टाईन अवॉर्ड’ आंतरशालेय सायन्स प्रोजेक्ट स्पर्धा, सर्वोत्कृष्ठ महिला बचत गट स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील १५ शाळांना संगणक संच भेट देण्यात आला.
    याप्रसंगी सौ.रजनीदेवी पाटील, रयत शिक्षण संस्था, क्रेडाई वुमन विंग, रोटरी क्लब सातारा, इनरव्हिल ग्रुप, लायन्स क्लब, स्पंदन ग्रुप आदी संस्थांचे पदाधिकारी, सातारा परिसरातील समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.