गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असतात: खा. श्रीनिवास पाटील

 


मारूल हवेली | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

    गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखवली तरच विकासाला अधिक गतीने चालना मिळते असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

    मारूल हवेली (ता.पाटण) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांची उपस्थिती होती.

     खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायती महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर गावाच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त होते. मात्र गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखविण्याची आवश्यकता आहे. ग्रामविकासामध्ये केलेले भरीव काम नागरिकांना पर्यायाने गावाला प्रगतीची दिशा दाखवते. त्यासाठी गावात वेगवेगळ्या लोकोपयोगी संकल्पना राबवण्यासह व सामाजिक एकोपा जपण्याची देखील आवश्यकता आहे. 

   जिल्ह्यातील प्रत्येक गाव हे आदर्श निर्माण करणारे व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील प्रतिनिधी आणि शासकिय अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी योग्य नियोजन करावे. प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, आपले योगदान द्यावे. जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सोबत असून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

     सारंग पाटील म्हणाले, गावचा विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. परंतु तो विकास साधताना दूरदृष्टीतून विकासकामांची आखणी व उभारणी झाली पाहिजे. सार्वजनिक कामात समाजाचा एक घटक म्हणून प्रत्येकाने आपआपले योगदान दिले तरच एकजूटीतून गावाची प्रगती साध्य होईल.

     प्रारंभी स्वागत सरपंच अशोक मगरे यांनी केले, सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी तर आभार दिपक नांगरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच स्मिता कदम, सिध्देश्वर दूध संस्थेचे चेअरमन संतोष पाटील, संजय नांगरे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.