कुंभारगाव परीसरात बिबट्याची दहशत ; दिवसाढवळ्या बिबट्या कडून शेळ्यांवर हल्ला.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण एक शेळी ठार तर दुसरी गंभीर जखमी.

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ता.पाटण येथून जवळच असणाऱ्या चाळकेवाडी येथील  परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.शेतकऱ्यांच्या पाळीव शेळी व जनावरांच्या वर बिबट्याचे सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. नुकतेच चाळकेवाडी परिसरातील रानात चरावयास गेलेल्या एका शेतकऱ्याच्या शेळ्यावर बिबट्याने भरदिवसा हल्ला केला. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे  बिबट्याने एक शेळी तेथेच सोडून दुसरी शेळी मात्र फरफटत दरीत घेऊन पसार झाला.

 या बाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की  चाळकेवाडी येथील शेतकरी पाझर तलावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या गळूगडेचा दरा शिवारात येथील शेतकरी शशिकांत बबन चाळके आपल्या पाळीव 5 शेळी,4 म्हशी घेऊन चारण्यास गेले होते. दुपारच्या दरम्यान या शेतकऱ्याला काही अंतरावरून गुरगुरंण्याचा आवाज आला म्हणून आवाजाच्या दिशेने पहिले असता बिबट्या शेळी तोंडात घेऊन दरीच्या दिशेने जाताना दिसला त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला या आवाजाने शेळीला तेथेच सोडून बिबट्या दरीतील दाट गवतात दिसेनासा झाला. 

 येथील अन्य शेतकरी शिवाजी बापू चाळके, संपत धोंडिबा चाळके, मंगल सोनाजी चाळके यांनीही येथील परिसरात अन्य शेळीचा शोध घेतला परंतु गवत जास्त वाढल्याने दुसरी शेळी सापडली नाही. जखमी शेळीवर सुतार डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार केले. येथील एक शेतकरी विठ्ठल चंद्रु चाळके यांची पाळीव गुरा पैकी लहान रेडकू गायब असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. 

 सदर घटने बाबत वनविभागातील वनपाल एस एस राऊत, वनरक्षक एस एस पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, गायब शेळीचा व रेडकाचा शोध घेतला परंतु ती सापडली नाहीत. वनविभागा कडून सर्व सहकार्य राहील शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्कात राहावे व आपल्या पाळीव जनावरांची काळजी घ्यावी असे वनपाल, वनरक्षक यांनी सांगितले. 

बिबट्याच्या सततच्या हल्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने याची गंभीर दखल घ्यावी व येथील शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.


बिबट्याने हल्ला केलेली जखमी अवस्थेतील शेळी.