कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गेले दीड वर्ष कोरोनाचे महाभयानक संकट यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व त्या संकटामध्ये आणखी भर म्हणजे वन्यप्राण्याकडून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वर सातत्याने होणारे हल्ले शेतकऱ्या साठी खूप मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहे.

याबाबत कुंभारगाव परिसरात घडलेली ताज्या घटनेने शेतकऱ्यावरील संकटाची प्रचिती येते. नुकतेच कुंभारगाव ता पाटण येथून जवळच मानेंचीवाडी येथील सचिन सुर्वे आपल्या 9 पाळीव शेळ्या चाळकेवाडी हद्दीतील बहिरीचा माळ शिवारात चरण्यास गेले होते, सायंकाळ च्या दरम्यान पाऊस होता घरी येताना त्यांच्या लक्षात आले की 9 पैकी 2 शेळ्या गायब झाल्या आहेत. मात्र घरी येईपर्यंत रात्र झालेने शोध घेता आला नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी बहिरीचा माळ परिसरात सर्वत्र शोध घेतला. सर्व परिसर पिंजून काढला सचिन सुर्वे सोबत प्रकाश बोर्गे, सुरज माने, श्रीरंग बोर्गे, शैलेश बोर्गे, या शेतकऱ्यांनीही या शोध मोहिमेत सहभाग घेतला यावेळी त्यांना बहिरीचा माळ शिवारात 2 शेळ्या मृत अवस्थेत सापडल्या. 

या घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल, वन रक्षक यांना सचिन सुर्वे यांनी दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही शेळ्यांचा पंचनामा केला, वनरक्षक, एस एस पाटील, वनपाल एस एस राऊत, यांनी सांगितले की प्रथमदर्शनी असे दिसते हा हल्ला वन्य प्राण्यानेच केला आहे. शेळी वर हल्ला झाला त्या परिसरात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, जनावरे डोगरात चरावयास नेताना शेतकऱ्यांनी एकत्र असावे. शेतकऱ्यांनी वन विभागाशी सातत्याने संपर्कात असावे असे आवाहनही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले.