लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 कराड : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा बंद कराड शहर तसेच तालुक्यात ही करण्यात यावा यासाठी संयुक्त बैठक कराड शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली व या बैठकीत उद्याचा बंद शांततेत व यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी *काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, *राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष शशिराज करपे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रदीप जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, काँग्रेसच्या कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष ऍड अमित जाधव, नितीन ओसवाल, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, गंगाधर जाधव, प्रताप पाटील, सादिक इनामदार, प्रशांत शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय मोहिते, तालुका प्रमुख नितीन काशीद, राजेंद्र माने, उपतालुका प्रमुख काकासो जाधव, उपशहर प्रमुख अक्षय गवळी, दिलीप यादव, शेतकरी व कामगार नेते अनिल बापू घराळ आदिसह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

लखीमपूर मध्ये अन्नदाता शेतकऱ्यांचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु असताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या पुत्राने या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालण्याचे अमानुष कृत्य केले व शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न केले या घटनेत 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. महाविकास आघाडी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, उद्याचा बंद कडकडीत पाळून या घटनेचा निषेध करावा. त्यासाठी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. उद्या कराड येथील दत्त चौकात सकाळी नऊ वाजता महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमणार असून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी तिन्ही पक्षातील कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवेला बाधा येणार नाही. निश्चितपणे हा बंद यशस्वी होईल आणि देशात चांगला संदेश जाईल अशी ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यावश्यक सेवा सुरु राहील अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे. अत्यावश्यक सेवेत मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका, हॉस्पिटल, दूध वाहतूक अशा अनेक सेवांना कुठल्याही प्रकारे बाधा येणार नसल्याचे यापूर्वीच सरकारने जाहिर केले आहे. त्यानुसार महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष साथ देतील असे आवाहन करण्यात आले.