मुंबईत तिसरी लाट येणार नाही तर मग गरब्याला परवानगी द्या ; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

मुंबईत झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणे शक्य नसल्याचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करत मुंबईत गरब्यावर घालण्यात आलेली बंदी मागे घेत घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्याला कोरोनाच्या नियमावलीसह परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. हिंदू सणाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मात्र मागील वर्षभराच्या काळात हिंदू सणांवर घालण्यात आलेल्या बंदी मुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. परंतू मुंबई पालिकेनेच आता तिसरी लाट येणार नसल्याचे स्वतःच मान्य केले आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्यासह आगामी काळात येणारे सर्वहिंदू सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.