ग्राहकांचे हित जपण्याची 'पाटण अर्बन'ची परंपरा कायम : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर

 

एटीएम सेवेचा शुभारंभ करताना माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, समवेत सत्यजितसिंह पाटणकर, दिनकरराव घाडगे व अन्य. (छायाचित्र : आराधना, पाटण)

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण अर्बन बँकेने सुरू केलेले एटीएम ग्राहकांना निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करावी लागणार नाही. एटीएमच्या माध्यमातून त्यांना तत्काळ पैसे मिळणार असल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे. पाटण अर्बन बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त एटीएमच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्राहकांचे हित जपण्याची बँकेने परंपरा कायम ठेवली असून सभासद व ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

दि पाटण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन महोत्सवानिमित्त पाटण शाखेत बसवण्यात आलेल्या एटीएमचा शुभारंभ पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, बाजार समितीच्या सभापती रेखाताई पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाषराव पवार, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव यांची उपस्थिती होती.

पाटणकर म्हणाले, पाटण तालुक्यातील बहुतांशी लोक पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी कामानिमित्त आहेत. अनेक सभासद व ग्राहकांची पाटण अर्बन बँकेत खाती आहेत. त्यामुळे या ग्राहकांना त्या त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी हे एटीएम कार्ड नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण अर्बन बँक सर्वसामान्य जनतेसाठी विविध सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. बँकेचा शाखाविस्तार झाला असला, तरी अद्याप एटीएम सुविधा नव्हती. दादांच्या संकल्पनेतून एटीएम सुविधा मूर्त स्वरूपात साकार झाली आहे. जिल्ह्यातील २०० कोटींच्या आतील ठेवी असणाऱ्या बँकांपैकी पाटणसारख्या ग्रामीण भागात एटीएम सुरू करण्याचा पहिला मान पाटण अर्बनला मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगली सोय झाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कपिलेश्वर यांनी एटीएम संदर्भातील माहिती दिली. चेअरमन दिनकरराव घाडगे यांनी स्वागत केले. व्हाईस चेअरमन शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक के. आर. शिंदे यांनी आभार मानले. दिलीपराव मोटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नथुराम झोरे, जयसिंग राजेमहाडिक, रामचंद्र पानसकर, विठ्ठलराव जाधव, वंदना सावंत, कविता हिरवे, सभासद व खातेदार उपस्थित होते.