राज्यातील MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर; 'या' कालावधीत होणार परीक्षा


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राज्यातील MHT CET परीक्षेच्या तारखांची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासह विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी या सीईटी परीक्षेची प्रतीक्षा राज्यातील विद्यार्थी करत होते. अखेर आज उदय सामंत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येतील व 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील,अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

यावर्षी प्राप्त झालेल्या अर्जानुसार सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. यावर्षी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी सीईटीसाठी एकूण १९८ परीक्षा केंद्रे होती. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असून २२६ केंद्रांवर सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. हि परीक्षा पार पाडण्यासाठी राज्यभरात एकूण ५० हजार संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, कोरोना आणि सोशल डिस्टंसिंग च्या अनुषंगाने २५ हजार संगणकांचाच या परीक्षेसाठी वापर होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून हि परीक्षा घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा आणि निकाल पार पडल्यानंतर १ ऑक्टोबर पासून महाविद्यालये सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले.

मुंबई अथवा अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सीईटीचं प्रवेशपत्र दाखवून मिळणार लोकल प्रवेश :
सीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी अथवा प्रवासासाठी कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येऊ नये, याकरता सीईटीचं प्रवेशपत्र दाखवून लोकल अथवा ट्रेनमध्ये प्रवेश देण्यासंबंधी डिझास्टर मॅनेजमेंटकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असून विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी होणार नाहीत व लोकल प्रवास करता येईल.