जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित :नरेंद्र पाटील


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत, सेवानिवृत्तीनंतर त्यांना गावात सन्मानाने वागवले पाहिजे असे मत अण्णासाहेब पाटील महामंडळ, फौडेंशन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते श्री विठृठल रखुमाई उत्सव मंडळ, धामणी यांच्यावतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण व माजी सैनिक आनंदा दिंडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच आशाताई नेर्लेकर, डाॅ.संदीप डाकवे, सचिन सावंत, बाजीराव सावंत, संजय सावंत, अशोक सावंत, अनिल दिंडे, धनाजी सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

सेवानिवृत्त फौजींनी गावातील मुलांना, स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, गावाला मार्गदर्शन करावे. असेही श्री.पाटील पुढे बोलताना म्हणाले. फौजी अशोक दिंडे यांनी विविध ठिकाणी केलेल्या सेवेचा त्यांनी बोलताना उचित गौरव केला.

याप्रसंगी डाॅ. पाटील, पोलिस पाटील विजय सुतार, संजय सावंत, विनोद कदम यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. दरम्यान डाॅ.डाकवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी फौजी अशोक दिंडे आणि नरेंद्र पाटील यांना त्यांची चित्रे भेट दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल दिंडे, दिपक दिंडे व मंडळाच्या पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले.