पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, अजय कवडे, बाळासाहेब देसाई व अन्य.
ना. पाटील यांना त्यांच्या कराड येथील निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट देऊन याबाबत निवेदन दिले.
निवेदनात ते म्हणतात, आम्ही पाटण तालुक्यातील सर्व शेतकरी आपणास विनंती करतो की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच अतिवृष्टीच्या पुरामुळे नदी पात्रा शेजारील शेतजमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेतीपंप, इलेक्ट्रीक पेटी व शेतीपंपाचे साहित्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीपंपाचे विजेचे पोल पडले आहेत. अतिवृष्टीमुळे डोंगराचे भुस्खलन होऊन माती शेतामध्ये येऊन पीके गाढली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होऊनही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसानग्रस्त सर्व शेतक-यांचा गांभीर्याने विचार करून नुकसान भरपाई मिळावी व शेतीपंपाची विद्युत जोडणी त्वरित करून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या समवेत पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटणचे नगराध्यक्ष अजय कवडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई, चंद्रकांत देसाई, लक्ष्मण चव्हाण, कुमार साळुंखे, तानाजी गुरव यांची उपस्थिती होती.