पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

रस्ते निर्मितीमुळे सातारा जिल्ह्यासह परिसराच्या विकासाची गती वाढेल : सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशीला अनावरण कार्यक्रम

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
 पश्‍चिम महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून रस्त्याचे जाळे निर्माण करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

कराड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 हजार 971 कोटी रुपयांचे 403 किलोमीटर लांबीच्या विविध रस्ते विकास कामांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर,खासदार संजय पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, नागपूरसाठी स्वस्तातली मेट्रो ट्रेन सुरू करत आहोत. त्याच धर्तीवर पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा जेवढे ब्रॉडगेज आहेत त्यावर आठ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते.  मेट्रो आठ डब्यांची असून या मेट्रोचा वेग प्रती तास 140 किलोमीटर एवढा असेल. त्यामध्ये इकॉनॉमी क्लासचे चार डबे, विमानसेवेप्रमाणे दोन बिझनेस क्लासचे डबे असतील. याद्वारे मालवाहतूकही करण्यात येईल. तसेच स्थानिक बेरोजगारांनाही यामाध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. या सेवेमुळे अंतर कमी वेळात पूर्ण करता येईल, असे श्री.गडकरी यांनी सांगितले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कायम आपल्या सोबत असू, असा विश्‍वास देत श्री.गडकरी म्हणाले, पुणे-बंगलोर हा नवा ग्रिन हायवे पुण्याप्रमाणेच या भागासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे प्रदुषण कमी करण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असणार आहे.

 देशात पाणी नियोजन अत्यंत आवश्यक असून एकीकडे पूर तर एकिकडे पाणी टंचाई ही विषमता दूर करण्यासाठी पाण्याचा वापर सुनियोजित व्हायला हवा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रस्ते निर्मितीमुळे सातारा जिल्ह्यासह परिसराच्या विकासाची गती वाढेल : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

रस्ते निर्मितीमुळे सातारा व पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना चांगली सोय होणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरात रस्त्यांची कामे सुरू असताना त्यादृष्टीने सहकार्य करावे. रस्ते विकासामुळे विकासाची गती वाढेल. दळणवळणाच्या सुविधा सुलभ होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने रस्त्यांची सर्व कामे वेळेत पुर्ण होतील असा विश्‍वास व्यक्त करतानाच राज्य सरकारही या रस्त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय (काका) पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मानसिंगराव नाईक, गोपीचंद पडळकर, महेश शिंदे, जयकुमार गोरे,सदाभाऊ खोत, ऋतुराज पाटील, श्रीमती सुमनताई पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह रस्ते वाहतुक विभागाचे मुख्य अभियंता राजीव सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार उपस्थित होते.