पाटण तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे यांची बदली रद्द करा.

पाटण तालुका सरपंच परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.


पाटण तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे यांची बदली रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सरपंच परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अत्यंत प्रमाणिकपणे काम करणारा चांगला अधिकारी खुप वर्षानंतर पाटण तालुक्याला लाभलेला आहे त्याची 8 च महिन्यात झालेली बदली ही पाटण तालुक्यातील जनतेवर अन्याय करणारी आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे जनमताचा विचार करून पाटणचे तहसीलदार योगेश टोंपे यांची बदली रद्द करावी अशी मागणी पाटण तालुका सरपंच परिषदेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे केली आहे.

     पाटण तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष संतोष शेडगे, सोनाईचीवाडीचे सरपंच सचिन माने, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष व सणबूरचे उपसरपंच संदीप जाधव, निसऱ्याच्या सरपंच शारदादेवी जाधव, विह्याचे सरपंच अविनाश पाटील, बनपूरीचे उप-सरपंच शिवाजीराव पवार, अंबवड्याचे अंकुश मोंडे, मारूल हवेलीचे अशोकराव मगर, नावडीच्या शोभा पुजारी यांच्यासह तालुक्यातील विविध गावच्या सरपंच,उपसरपंच यांच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

           निवेदनात म्हटले आहे की योगेश टोंपे यांनी प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून 1 फेब्रुवारी 2021 रोजी पाटणचा पदभार स्विकारला तालुक्यावर कोरोना व अतिवृष्टी आणि भुस्खलन या सारखी आपत्ती कोसळली तेंव्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थाना विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे योग्य नियोजन केले. कोरोना कालावधीत सर्व यंत्रणेसह जनतेला विश्वास देऊन कोरोना रूग्ण संख्या व कोरोना मृत्यूदर आटोक्यात राखण्यात यश मिळवले. तर अतिवृष्टी व भुस्खलन यासारख्या आपत्तीत वेळेत घटना स्थळावर समक्ष पोहोचून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी परिश्रम घेतले आहेत महसुल यंत्रणेला शिस्त लावल्याने या विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जनतेतही समाधान आहे.

         सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रामाणिक काम वेळेत करण्याची प्रशासनाला सवय लावणारा चांगला अधिकारी खुप वर्षानी पाटण तालुक्याला लाभल्याचे समाधान जनतेत आहे अशा अधिकाऱ्याची बदली करून जनतेचे समाधान हिरावून घेऊ नये अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.