‘संमिश्र शिक्षण पद्धत’ काळाची गरज : सौ.रुपाली पाटील

सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरु कधी होईल, हे आज सांगता येणे कठीण आहे. शाळा सुरु झाल्याच तरी, सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण आहे. सरकारने शाळा ‘ऑनलाईन’ सुरु करायला परवानगी दिली आहे. अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे, ऑनलाईन उपक्रम सुरु देखील केले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन यांचे सुयोग्य मिश्रण असलेली ‘संमिश्र शिक्षण पद्धत’ ही भविष्यातील महत्वाची शिक्षण पद्धत ठरू ​शकते, असे आजचे चित्र आहे. साधारणतः शिक्षणाचे तीन प्रमुख घटक असतात. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या तीन घटकांसाठी शिक्षणप्रक्रिया राबविली जाते. आता हे तीनही घटक या नव्या ऑनलाईन माध्यमांमधून पूर्ण करता येतील अशी व्यवस्था किंवा प्रणाली वापरायला हवी. सध्याची परिस्थिती बघता बहुसंख्य शाळा अथवा प्रशिक्षक फक्त ‘अध्यापन’ ऑनलाईन करण्यावर भर देत आहेत, असे दिसत आहे. झूम किंवा गूगल मीट सारखे तंत्रज्ञान वापरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा व्हिडियो कॉल सेटअप करणे आणि त्यात शिक्षकांनी वर्गात बोलतात, त्याप्रमाणे बोलून शिकवणे अशी सध्याच्या बहुसंख्य ऑनलाईन वर्गांची परिस्थिती दिसत आहे. काही कल्पक शिक्षक आपल्या लेक्चरचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून, ते व्हिडियो कॉलवर दाखवतात आणि विषय समजावून सांगतात. काही शिक्षक फळा समोर ठेवून, त्यावर वर्गात शिकवत असल्यासारखे खडूने मुद्दे लिहून शिकवतात. तर काहीजण नुसतंच व्हिडियो कॉलवर बोलल्यासारखे बोलतात. अर्थात, यात शिक्षकांचा काही दोष आहे, असे नाही. शिक्षकांचे सर्व प्रशिक्षण हे वर्गात शिकवण्याच्या दृष्टीने झालेले असताना आणि वर्गात शिकवण्याचाच अनुभव त्यांच्यापाशी असताना अचानक ऑनलाईन अध्यापन करावे लागणे, हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठा बदल आहे. यासाठी त्यांचे प्रशिक्षण झालेले नाही किंवा अगदी कमी वेळात तशी तयारी त्यांना करावी लागली आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा प्रभावीपणे वापर शक्य

ऑनलाईन शिक्षणाच्या प्रणालीची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर, त्याचा अनेक स्तरांवर फायदा होऊ शकतो. ज्ञानदानासाठी किंवा क्षमताविकसनासाठी, एका शारिरिक वयाच्या ५०-१०० मुलांना एका छताखाली रोज जमवून, त्यांना एकाच पद्धतीचे शिक्षण देणे शक्य होते. पण अगदी कोरोना येण्यापूर्वीपर्यंत या परिस्थितीत काहीसा फरक पडला नव्हता. कोरोनाच्या या झटक्याने आपण अचानक नव्या पद्धतीत आलो आहोत. भविष्यात या नव्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत प्रत्येकासाठी व्यक्तिगत शिक्षणाचे नियोजन (लर्निग प्लॅन), शिक्षणाचा मार्ग (लर्निंग पाथ) असू शकतात. वयानुसार आणि व्यक्तिगत क्षमतेनुसार त्या नियोजनामध्ये लवचिकता येऊ शकते. म्हणजे दहा वर्षांचे एक मूल त्याच्या नैसर्गिक क्षमतेनुसार, चौथीचे तर दुसरे मूल त्याच्या क्षमतेनुसार सातवी-आठवीचे गणित शिकू शकते. हे आज घडत नाही, पण उद्या कदाचित असे घडू शकेल. प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार आणि आवडीनिवडीनुसार आपल्या शिक्षणाचा मार्ग निवडू शकेल.

ऑफलाईन शिक्षणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करावी लागणारी महाकाय गुंतवणूक, वाहतुकीची व्यवस्था आणि त्यासंबंधी इन्फ्रास्ट्रक्चर, मुलांचा जाणारा वेळ आणि त्या दरम्यानच्या त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या समस्यांचे निराकरण ऑनलाईन शिक्षणामध्ये होऊ शकते. शिक्षण सर्वदूर पोहोचवता येऊ शकते. संमिश्र शिक्षण हीच काळाची गरज आहे. ही पद्धत अत्यंत कमी खर्चात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकते. आणि प्रत्येकाला आपापल्या आवड आणि क्षमतेनुसार घेता येईल असे शिक्षण खरोखर महत्वाचे आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणाच्या काही महत्वाच्या मर्यादांमुळे पारंपारिक शालेय शिक्षण आणि शाळांना तो संपूर्ण पर्याय ठरेलच असे नाही. संमिश्र शिक्षण पद्धत ही भविष्यातली महत्वाची शिक्षण पद्धत होऊ शकते. जे विषय ऑनलाईन शिकता येणे शक्य आहे त्यांचे अध्यापन-अध्ययन ऑनलाईन होणे. जे विषय प्रत्यक्ष एकत्र येऊनच शिकावे लागतात त्यासाठी शाळांसारख्या संस्थांमध्ये एकत्र येणे, प्रॅक्टिकल्स, ठराविक अंतराने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष शाळेत बोलवून आढावा घेणे, लिखाणाचा सराव करून घेणे, शाळेत मर्यादित विद्यार्थी संख्यासाठी परीक्षेचे आयोजन करणे , विद्यार्थी प्रगतीचा आढावा पालकांना ऑनलाईन पद्धतीने देणे, मर्यादित पालक उपस्थितीसह पालक सभांचे आयोजन करणे अशा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर येणाऱ्या काळात करावा लागेल. त्याचबरोबर मूल्यमापनाच्या पद्धतींमध्ये प्रमाणीकरण करून त्या ऑनलाईन पद्धतीने राबवल्या तर देशातल्या कोणालाही कुठूनही हव्या त्या अभ्यासक्रमाची परीक्षा देता येणे शक्य होईल. या सर्व एखाद दुसऱ्या वर्षात घडणाऱ्या गोष्टी नाहीत. वर्षानुवर्षे अनेक सरकारी आणि खासगी संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधत प्रयत्न केले तर संपूर्णपणे आधुनिक आणि सर्वांना उपलब्ध अशी नवी शिक्षण व्यवस्था आपण उभी करणे शक्य आहे. परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेतली, संमिश्र शिक्षण पद्धत अवलंबणे आवश्यक आहे.  

सौ. रुपाली पाटील ,
संचालिका : ब्रिलियंट अकॅडमी , कराड