ग्रामपंचायत पवारवाडी व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना जन सहकार निधी लिमिटेडचे चेअरमन मारुतीराव मोळावडे समवेत इतर मान्यवर.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आपल्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी चांगले पोषण घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या विषयाचे महत्त्व ओळखून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा “जागतिक पोषण दिन” साजरा केला जातो.

याचेच औचीत साधत ग्रामपंचायत पवारवाडी व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह अंतर्गत काळगाव विभागाच्या बीट स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) चे सदस्य व जन सहकार निधी लिमिटेडचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आयोजकांकडून मुलांना देण्यात येणाऱ्या आहाराची व सर्व सुविधांची माहिती जाणून घेतली व त्यांच्या मार्फत स्तनदा माताना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात रांगोळी,पोषण शिडी, सेल्फी पॉइंट, घोषवाक्ये, पोस्टर्स, पथनाट्य, आहार मनोरा आश्या विविध माध्यमातून पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यात आली. 

ग्रामपंचायत पवारवाडी चे सरपंच दत्तप्रसाद कदम यांच्या हस्ते पाककृती स्पर्धेतील विजेते व सहभागी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सेविका, मदतनीस यांच्या पोषण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

तसेच या वेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभर्थ्याच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी कृष्णा हॉस्पिटल येथील आहार तज्ज्ञ कोमल सावंत, मानसोपचार तज्ज्ञ शुभांगी जमाले यांचे मार्गदर्शन लाभले.  

या कार्यक्रमासाठी गरोदर माता, किशोरी पालक, विभागातील सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, icds पर्यवेक्षिका अरूंधती गरुड, कुसुम दीक्षित, सचिन ताईगडे ,सरपंच आत्माराम पाचूपते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.