अतिवृष्टीने भुस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव द्यावा ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

 


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भुस्खलन झालेल्या दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांमधील कुटुंबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसना बाबतचा प्रस्ताव तत्काळ शासनास सादर करावा, अशा सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या व दरडी कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना केल्या. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी पुनर्वसन करावयाच्या गावांच्या नुकसानीची माहिती या बैठकीत दिली.