सभासदांना 5 टक्के लाभांश जाहीर : अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गेल्या 35 वर्षापासून संचालक मंडळाने योग्यवेळी बँकेच्या व्यवसाय वाढीस महत्व देवून त्यात गुणात्मकता जोपासली आणि निश्चित कार्यपद्धतीला महत्व दिले. याचाच परिणाम म्हणून बँकेचा व्यवसाय आज 4,500 कोटींपर्यंत पोहचला आहे. बँकेचा भविष्य काळ उज्वल असून कराड अर्बन हेच नाव वैभव ठरणार असल्याचा आत्मविश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी व्यक्त केला. बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली.
मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लगेचच संपणार नसल्याचे ओळखून बँकेने मार्च पासूनच बँकेची वाटचाल अधोरेखीत केलेली होती. या महामारीमुळे सातत्याने होत असलेल्या टाळेबंदीचा योग्य वापर करून बँकेने संगणक प्रणाली अद्ययावत करणे, सायबर सेक्युरिटीच्या दृष्टीने उपाय योजना व व्यवसाय रचनेचा अभ्यास करून विविध उपयुक्त योजनांची कार्यवाही केली. तसेच वसुलीसाठी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच कर्जदारांशी संपर्क अभियान राबविले; याप्रकारे नकारात्मक कालखंडाचा वापर सकारत्मकतेने केल्यामुळे मार्च-2021 अखेरचे चित्र अत्यंत सक्षम व सदृढ राखण्यात बँक यशस्वी झाली असल्याचे अध्यक्षीय भाषणातून बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी सांगितले.
कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या निर्णया नुसार कराड अर्बन बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (सोमवार दि.27 रोजी) उत्तमरित्या संपन्न झाली. यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह सभासदांची ऑनलाईन उपस्थिती लक्षणीय होती.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे कर्जवसुलीवर बराच ताण होता; तरी देखील बँकेकडून कर्जदार ग्राहकांना नियमित कर्जपरतफेडीचे महत्व सातत्याने पटवून देवून त्यांना परतफेडीसाठी प्रोत्साहित केले याचेच फलित म्हणून गतवर्षीच्या निव्वळ एन.पी.ए. च्या प्रमाणात यंदा 2.68% नी मोठी घट नोंदवत ते प्रमाण 4.97% इतके राखले.
सरकारने बँकांना प्रभावी आणि परिणामकारक वसुलीसाठी नादारी व दिवाळखोरी कायद्याचे कवच दिले आहे. याचा बँकेने प्रभावी वापर करत सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन थकीत रकमेची वसुली करण्यात यश मिळविले आहे. या कायद्याचा वापर करून वसुली करणारी कराड अर्बन बँक ही एकमेव सहकारी बँक ठरली आहे. सभासदांना भरघोस लाभांश देणेसाठी बँकेने अपेक्षीत नफा क्षमता गाठली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या दूरदृष्टी धोरणांनुसार, बँक यावर्षी सभासदांना 5% लाभांश देत आहे असे अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी जाहिर केले.
बँकिंग व्यवसायाचे जोखीम हा अविभाज्य भाग असून यामध्ये प्रामुख्याने क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क आणि ऑपरेशनल रिस्क अशा जोखिमांना सामोरे जावे लागते. रिझर्व्ह बँकेने या जोखिमांचे वेळीच निर्धारण व्हावे आणि वेळीच उपाययोजना करता यावी यासाठी अतं र्गत लेखापरिक्षण कार्यपद्धतीचा अवलंब क रणे बंधनकारक केले असून मार्च-2022 पूर्वी सदरची लेखापरिक्षण कार्यपद्धती सुरू होणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी बँकेने नियोजन केले असून त्यासाठीच्या आवश्यक सॉफ्टवेअरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निर्धारित वेळेपूर्वी एका उत्तम सॉफ्टवेअरद्वारे याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास व्यक्त करून डॉ.एरम पुढे म्हणाले, मार्च-2021 अखेर अग्रक्रम क्षेत्राला 43.69% कर्जपुरवठा केलेला असून मार्च 2022 अखेर 50% उद्दीष्ठ ठेवले आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी केलेल्या अर्थपुरवठ्याचे प्रमाण 5.87% असून हे प्रमाण सन 2021-22 मध्ये 11% पर्यंत वाढविणे गरजेचे असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम राहणार आहे. तसेच बँकेच्या कर्जव्यवहारापैकी 50% कर्जे ही प्रती कर्जदार रू.25 लाख किंवा टायर 1 कॅपिटलच्या 0.20% यापैकी कमाल रकमेच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे, यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्च-2024 अखेरची कालमर्यादा दिली आहे. बँकेच्या मार्च 2021 च्या स्थितीचा विचार करता अशा छोट्या कर्जांचे एकूण कर्जामध्ये 28.47% इतके प्रमाण असून मार्च-2022 अखेर याप्रमाणात 32.74% पर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी कालबद्ध वाटचाल कशी करावी याचे नेटके नियोजन केले असून यासठी सेवकांना छोट्या कर्जांचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याचेही अध्यक्ष डॉ.एरम यांनी सांगितले. अध्यक्ष डॉ.सुभाष एरम म्हणाले, कराड अर्बन बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इडिया यांच्या परिपत्रकीय सूचना तसेच बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट मधील झालेले बदल यांची तत्परतेने अमंलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीची आर्थीक पत्रे रिझर्व्ह बँकेच्या नवीन परिपत्रकीय सूचनांनुसार अहवालामध्ये सादर केली आहेत. मार्च-2021 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.4451 कोटी असून रु.58 कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु.20.12 कोटींचा नफा झाला आहे. या मध्ये बँकेच्या 25 शाखांना रुपये 1 कोटीपेक्षा जास्त नफा झाला आहे तर भागभांडवलामध्ये रु.53.48 लाखांची वाढ झाली आहे. तसेच चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) किमान 9% राखण्याचा नियम असताना, बँकेने ते प्रमाण 16.14% इतके राखून आपली आर्थिक सदृढता सिद्ध केलेली आहे. गतवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोरोना पार्श्वभूमीवर बँकांचा आर्थिक पाया सक्षम व विस्तृत व्हावा या उद्देशाने लाभांश न देण्याच्या सूचना केल्या होत्या परंतू बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार चालू वर्षासाठी 5% इतका लाभांश देण्याचे ठरविले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी नोटीस व संचालकांनी ठराव वाचन केले. सभेच्या शेवटी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी सभासदांनी विचारलेल्या ऑनलाईन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली, मनोगत व्यक्त केले व ऑनलाईन उपस्थित असलेल्या सभासदांचे आभार मानले.