अण्णासाहेब पाटील फाउंडेशनतर्फे माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही,लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोरोना संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे उदगार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून नवीमुंबईत माथाडी भवन येथे माथाडी कामगारांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला १० हजार लसीचे डोस उपलब्ध करुन देऊन लसीकरण झाल्यानंतर आणखी १० हजार लसीचे डोस देणार असल्याचे घोषीत केले व अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला एक रुग्णवाहिकाही देणार असल्याचे घोषीत केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक फाऊंडेशनचे चेअरमन , माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माथाडी युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.यावेळी आमदार गणेश नाईक,आमदार शशिकांत शिंदे,आमदार प्रसाड लाड,आमदार निरंजन डावखरे,माजी आमदार संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, ऍड. भारतीताई पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी हॉस्पीटल ट्रस्टचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील आणि फाऊंडेशनचे सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.