कोरोना काळातील पहिले महिला बचत गटाचे प्रदर्शन चेंबूरमध्ये संपन्न


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनामूळे लागू केलेल्या लॉक डाउनमूळे मुंबईतील सर्व सामाजिक संस्थांचे अनेक उपक्रम मागील अडीच वर्षांपासून बंद आहेत. मात्र काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने स्वयंसिद्ध महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाचे प्रदर्शन व विक्री उपक्रम नुकताच चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात कोरोना नियमांचे पालन करत पार पडला.

स्वयंसिद्ध महिला सेवा संस्था मुंबईच्या अध्यक्षा स्वाती सौदागर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर ,चेंबूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि शिवसेना विधानसभा संघटक व माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नय सौदागर आणि अथर्व सौदागर यांनी केले होते. महिला सक्षमीकरण आणि महिलांना त्यांच्या उद्योग व्यावसायासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने पार पडलेल्या या महिलांच्या वस्तू विक्री आणि प्रदर्शनाला चेंबूर परिसर आणि मुंबई उपनगरातील बहुसंख्य महिला आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला.