जितकरवाडीचे कायमस्वरुपी पुनवर्सन करण्याची मागणी


तळमावले|डाॅ.संदीप डाकवे
22 जुलै रोजी रात्री कोसळलेल्या डोंगरामुळे जितकरवाडील 93 जणांचे स्थलांतर जिंती येथील हायस्कूल मध्ये करण्यात आले आहे. या लोकांना सध्या विविध सामाजिक संघटना, संस्था, समाजसेवक, मंडळे यांच्याकडून मदत मिळत आहे. प्रशासनदेखील त्यांच्या पातळीवर त्यांची काळजी घेत आहे. परंतू आमचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे अशी मागणी येथील बाधित लोकांनी केली आहे.

मुसळधार पावसाने छोटयाशा वस्तीवर आलेले डोंगराचे संकट सुदैवाने टळले. आणि येथील लोकांना केवळ अंगावरील कपडयानिशी बाहेर पडावे लागले. स्वतःचं राहतं घर सोडताना या लोकांना आभाळाएवढया वेदना झाल्या. जीव वाचल्याचा लोकांना आनंद आहे पण भविष्याचे काय? अशी चिंता या लोकांपुढे आहे. घरच्या आठवणींने या लोकांच्या डोळयातील अश्रूच आटले आहेत. अजूनही मृत्युच्या दाढेखाली काही माणसे अडकून पडली आहेत. त्यांचे वय झाले आहे आणि त्यांना चालता येत नाही. प्रत्येकाच्या घरातील कोंबडया, जनावरे यांचे हाल काय होत आहे हे न सांगितलेलेच चांगले. स्वतः सुरक्षित ठिकाणी आले असले तरी लोकांची घरांच्या मुळे चिंता वाढली आहे.



या भागात बहुतांशी भात घेतले जाते. भाताची लावणी केली जाते. लावणी सुरु करण्यापूर्वीच या लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. काही थोडीशी शेती सोडली तर भात लावलेलेच नाही. लावलेले तरु तसेच आहे. अनेक शेती, वावरे पाण्याच्या लोटाने वाहून गेली आहेत. त्यामुळे पुढे खायचे काय? हा प्रश्न या लोकांसमोर पडला आहे.

ज्या लोकांना चालता येत नाही, ज्यांना उचलून आणणे शक्य नाही अशा 10 ते 12 लोकांना अजूनही जितकरवाडीतच ठेवले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. औषधे वेळेवर देता येणे शक्य नाही अशा कितीतरी अडचणी त्यांच्यासमोर आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे लोकांची मने येथे लागत नाहीत. असे येथील लोकांनी सांगितले आहे.

प्रत्येकाच्या घरात कोंबडया आहेत, काहींच्या घरात म्हैशी, शेळी व अन्य जनावरे आहे. काहींनी दावणीवरच येईल त्या किमतीला विकली आहेत तर जी जनावरे आहेत त्यांना वैरण पाणी याची सोय करता येत नाही. मुक्या प्राण्याचे काय हाल झाले असतील याची कल्पना देखील करवत नाही अशी भावनिक प्रतिक्रिया पाणावलेल्या डोळयांनी एका महिलेने दिली आहे.

जितकरवाडीत यंदा 10 ते 12 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी बहुतांशी लोकांच्या घरांची कामे पूर्ण झाली आहेत. काहींनी नवीन घरामध्ये काही दिवस घालवले. पण ते घर उभं करताना घेतलेल्या कष्टाची जाणीव होताच डोळयांतून अश्रूंच्या धारा लोकांच्या डोळयातून येत आहे.



अतिशय दुर्गम भागात असूनदेखील येथील लोकांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आहे. या छोटयाशा वस्तीतील 5 ते 6 मुली महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. नेटवर्क नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षणाला मुकावे लागत आहे. तसेच अभ्यास करताना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेकांनी कर्जे काढून मुलांना उच्च शिक्षण दिले आहे.

शाळेत लाईटची सुविधा नसल्यामुळे मोबाईल चार्जींग करण्यासाठी बाहेर द्यावा लागतो. त्यामुळे संपर्क साधणे कठीण होवून बसले आहे. जिंती आणि जितकरवाडीला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे पलीकडे जाणे अशक्य होत आहे. किमान पलीकडे जाण्याइतपत तरी तो दुरुस्त करावा अशीही माफक अपेक्षा यावेळी लोकांनी व्यक्त केली आहे.

____________________________________
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी भेट घ्यावी :
येथील लोकांचे स्थलांतर केल्यानंतर अनेक सामाजिक संघटना, संस्था, मंडळे, समाजसेवक यांनी भेटी दिल्या आहेत. लोकांना मदत देवून आधार दिला आहे. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते यशराजदादा देसाई, हिंदूराव बापू पाटील व अन्य नेत्यांनी भेटी देवून लोकांना धीर दिला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आमची भेट घेवून आम्हाला आधार द्यावा तसेच कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यातबाबत ठोस भूमिका घेवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या लोकांनी केली आहे.
____________________________________