उंडाळे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान.


उंडाळे : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र व रोप देऊन सत्कार करताना मान्यवर. (छायाचित्र जगन्नाथ माळी,उंडाळेे) 

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :                               
उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर, कर्मचारी, व कोरोनातून बरे झालेल्या 150 जणांचा "कोरोना योद्धा" प्रमाणपत्र गुलाब पुष्प, रोप देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून संदिप कोटणीस, उपस्थित होते. 

यावेळी त्वचारोग तज्ञ डॉ. वर्षा जमाले, भूलतज्ञ प्रमोद जमाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर. डॉ. सुनील कोठावळे, सरपंच सौ संगीता माळी, उपसरपंच बापूराव पाटील, पोलीस पाटील नानासो पाटील, ग्रामसेवक श्री चव्हाण, तलाठी श्री कुनकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.      

कार्यक्रमाच्या प्रारंभी शर्वरी कोगनुळकर यांनी ये मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत गायन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात या हेतूने रुग्णालय उभे राहिले. आज सर्व जगापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या महामारीच्या काळात रुग्णालयात 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले असून गेल्या तीन महिन्यात या रुग्णालयातून दोनशेवर रुग्ण बरे करून पाठवले आहेत. 

लसीकरणाचा तीन हजाराचा टप्पा आम्ही पूर्ण केला असून परिसरातील लोकांच्या साठी कोरोना ट्रस्ट सेंटर उभे केले आहे. या सर्व सेवासुविधा रुग्णालयातील कर्मचारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.                

यावेळी कोरोनातून बरे झालेले कोरोना योद्धा म्हणून सन्मान झालेले प्रा. पाडूरंग डांगे म्हणाले, मानवतावादी दृष्टीकोन समोर ठेवून रुग्णालयाचे प्रशासन काम करत आहे. डॉ. शेखर कोगनुळकर व त्यांचे सहकारी रुग्णसेवेसाठी अविरतपणे काम करत आहेत. या ठिकाणी दाखल रुग्णांना प्रेरणा देण्याचे काम कर्मचारी करत आहेत ते स्वतः अनुभवले आहे शासकीय रुग्णालयाचे महत्व देशात सामान्य माणसांच्या साठी वरदान ठरत आहेत.                         

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, रोप देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी डॉ. शेखर कोगनुळकर यांनी देशभक्तीपर गीत गायले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत जोंधाळ यांनी केले तर डॉ. कोगनुळकर यांनी स्वागत केले डॉ. सुनील कोठावळे यांनी आभार मानले.