माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप

 कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 कराड: गेल्या आठवड्यात राज्यात विशेषतः कोकण भागासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर या भागात अतिवृष्टी झाली यामुळे नद्या नाले यांना पूर आले व हे पुराचे पाणी गावात शिरून लोकांची घरे, उपयुक्त घरातील साहित्य वाहून गेले. या बाधित गावांचा तसेच पुरग्रस्तांची व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला हा दौरा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केल्यामुळे पुरबाधितांचे झालेले नुकसान पाहून कोणकोणत्या गोष्टी तातडीच्या स्वरूपात करणे आवश्यक आहे त्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यावेळी आ. चव्हाण यांनी दिल्या. या पूरग्रस्तांना आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले. किमान उपयुक्त साहित्याचे  वाटप किटमधून पूर बाधितांना देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जि प सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, प्रा धनाजी काटकर, राजेंद्र चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्या थोरवडे, अशोक पाटील, वैशाली माळी आदी यावेळी उपस्थित होते. 

या मदत किटचे वाटप पोतले, येणके, आणे, नांदगाव या गावातील बाधित कुटुंबाना करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो आटा, १ किलो साखर, ४ ताट, ४ वाटी, ४ ग्लास, ४ चमचे, तांब्या-फुलपात्र, कढई, तवा आदी संसार उपयोगी साहित्याचे प्रत्येक कुटुंबाला साहित्याचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कराड दक्षिण मधील पुरबाधितांना उपयोगी साहित्याच्या मदत किटचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून सुद्धा पूर बाधितांना मदत दिली जात आहे. सद्या प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ दिले जात आहे. तसेच पुरबाधितांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन बाधित कुटुंबाना आर्थिक मदत सुद्धा शासनाकडून दिली जात आहे. याचसोबत पुरामध्ये रस्ते, कठडे, पूल, विजेचे खांब आदी सार्वजनिक गोष्टींचे नुकसान झाले आहे यासाठी सुद्धा लवकर निधी मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे.