कराडमध्ये वन विभागाची मोठी कारवाई : वाघ व बिबट्याची नखे विक्री प्रकरणी दोन जणांना अटक


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ आणि बिबट्याची नखे विकणार्‍या टोळीतील दोघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 वाघ आणि बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. दिनेश बाबूलालजी रावल (वय 38), अनुप अरुण रेवणकर (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वन विभागाला गुप्त माहिती मिळाली आणि वनविभाग आणि वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्याची नखे विकणार्‍या संशयितांवर पाळत ठेवून होते. यादरम्यान सोमवारी (16 ऑगस्ट) रावल आणि अनुप रेवणकर हे वाघ आणि बिबट्याची नखे विक्री करणार असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाने कारवाई केली.



कृष्णा नाका येथील सावित्री कॉर्नर बिल्डिंगमध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे आरोपी दिनेश रावल हा दोन वाघनखे घेऊन विक्रीसाठी आला. त्यावेळेस वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला पकडले. पुढे त्याला ताब्यात घेऊन लगेचच दुसरा संशयित अनुप रेवणकरला पकडण्यासाठी अधिकारी रविवार पेठ येथील काझी वाड्याजवळ आले. तिथे त्यांनी मयूर गोल्ड या दुकानात धाड टाकली. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपीजवळ 8 वाघ आणि बिबट्याचे नखे तसेच त्याच्या गळ्यात एक वाघ नख असे एकूण 11 नख वन विभागाला मिळाले. वन विभागाने सर्व नखे जप्त केली आहेत. तसेच दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा तसेच वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके हे कारवाईत सहभागी झाले होते.