उद्योगपती अदानीला शिवसेनेचा दणका मुंबई विमानतळाबाहेरील बोर्ड हलविला

 


मुंबई - शिवसेना - भाजपातील वाद आता पेटत चालला आहे.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी या बोर्डाची जोरदार तोडफोड केली आणि हा बोर्ड फोडून तिथून लगेच हटवला. त्यामुळे विमानतळाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मुंबई विमानतळाच्या व्हीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील अदानी एअरपोर्ट बोर्ड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या मारून तोडला. त्यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी एअरपोर्ट असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नसल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.

दरम्यान, मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला. यानंतर या विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी एअरपोर्ट असे बोर्ड लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की  छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव फक्त महाराष्ट्र, मुंबई किंवा देशापुरतं नसून संपूर्ण जगभरात ओळखलं जातं. याआधी जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या तिथे होत्या. पण त्यांनी कधीही विमानतळाला नाव दिले नाही. अदानींनी विमानतळ विकत घेतलं आहे का? विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असताना जाणुनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहेत? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.