म्हाडाने सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातच घरबांधणी करावी ; नगरसेविका आशा मराठेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  म्हाडाने गेल्या दोन वर्षांपासून घरे उपलब्ध नसल्याने घरांची सोडत काढलेली नाही.तरी म्हाडाने काही खासगी संस्था आणि व्यक्तींना विविध कारणांसाठी आपल्याकडील भूखंड वितरित केले आहेत.

पण अनेक भूखंड लोकोपयोगी कामासाठी वापरले जात नसून ते केवळ त्यांच्या ताब्यात आहेत. असे मोकळे,वापरात नसलेले भूखंड म्हाडाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी सर्वसामान्यांना परवडेल अशी घरे बांधावीत अशी मागणी चेंबूरच्या भाजप नगरसेविका आशा मराठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आशा मराठे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हाडाने काही खासगी संस्था आणि व्यक्तींना विविध कारणांसाठी विशेषतः गृहनिर्माण संस्थाना आपले मोकळे भूखंड वैद्यकीय , व्यायामशाळा,खेळाची मैदाने,अंगणवाड्या आणि वाचनालये आदींसाठी वितरित केले आहेत. पण यातील अनेक भूखंड प्रत्यक्ष वापरावीना पडून आहेत.३-३ वर्षे उलटूनही हे भूखंड त्यांच्या ताब्यात आहेत.असे भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे म्हाडाने धोरण काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे.पण त्याची कुठेही झालेली दिसत नाही.त्यामुळे असे भूखंड ताब्यातघेऊन त्यावर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील घरे बांधावीत अशी मागणी आशा मराठे यांनी या निवेदनात केली आहे.