सुप्रदा फातर्पेकर यांच्या पुढाकाराने चेंबूरमध्ये सर्वांत मोठी लसीकरण मोहीम


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील सर्वांत मोठी मोफत लसीकरण मोहीम नुकतीच चेंबूरमध्ये पार पडली.शिवसेनेच्या तडफदार युवा सेना नेत्या आणि लोकप्रिय माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांच्या नेतृत्वाखाली चेंबूरमध्ये या विशेष महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या लसीकरण शिबिरामूळे चेंबूरच्या झोपडपट्टी परिसरातील तब्बल ४ हजार नागरिकांना एकाच दिवशी प्रामुख्याने लसीकरणाचा लाभ घेता आला. 

चेंबूरमधील सुभाष नगर येथील समाज मंदिर हॉल आणि चेंबूर कॅम्प येथील नॅशनल सर्वोदय स्कुलमध्ये हे विशेष महालसीकरण शिबिर पार पडले.यावेळी सुप्रदा फातर्पेकर म्हणाल्या की, राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री यांनी स्वतः आमच्या या शिबिरासाठी या लसींचा साठा उपलब्ध करून दिला होता.ही आमची आतापर्यंतची सहावी लसीकरण मोहीम आहे.याआधी आम्ही ५३४५ नागरिकांना लस मिळवून देण्याचे काम केले असून ही आमची सर्वांत मोठी मोफत लसीकरण मोहीम आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे अशा नागरिकांना लस घेणे अत्यंत गरजेचे असून त्यांना लाभ घेता यावा म्हणून आम्ही या विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले.आता एक महिन्यानंतर आणखी एक असेच महा लसीकरण शिबिर आयोजित केले जाईल.सुप्रदा फातर्पेकर यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून सातत्याने त्या समाजकार्यात आघाडीवर राहताना दिसत आहेत.हे महालसीकरण शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुप्रदा फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूरच्या युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोरोना नियम पाळत नियोजनपूर्वक विशेष मेहनत घेतली.