चेंबूर कर्नाटक हायस्कुलमधील वाढीव शालेय फी विरोधात पालकांचे आंदोलन

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच- स्वाती पाटीलमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमूळे शाळा बंद असतानाही चेंबूर कर्नाटक हायस्कुलमध्ये वाढीव शालेय फी वसुलीची जाचक मोहीमच शाळा व्यवस्थापनाने उघडल्याने आज संतप्त पालकांनी या शाळेच्या निर्णयाविरोधात ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनात पालकवर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान आणि उत्कर्ष महिला समितीच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांच्या नेतृत्वाखाली समस्त पालकांनी हे ठिय्या आंदोलन केले.यावेळी स्वाती पाटील म्हणाल्या की, न्यायालयाने कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना फीमध्ये १५ टक्के सवलत दिली जावी असा निर्णय घोषित केला आहे.तरीही चेंबूर कर्नाटक हायस्कुलमध्ये पालक वर्गाला वाढीव शालेय फी आकारून वेठीस धरले जात आहे.त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.संपूर्ण फी भरल्याशिवाय दहावीचे निकाल आणि शाळा सोडल्याचे दाखलेही अडवून ठेवले आहेत. शाळेच्या ज्या सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नसताना त्याची रक्कम पालकांनी का भरायची? तरी जोपर्यंत वाढीव फी रद्द केली जात नाही आणि तसे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोल सुरूच राहणार असल्याचा निर्धार स्वाती पाटील यांनी व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्त्या विना दळी, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ उर्फ रामचंद्र मेस्त्री व विजय भोसले यांच्यासह बहुसंख्य पालक सहभागी झाले होते.