धनाजी चाळके यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा. एक स्तुत्य उपक्रम


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
निमित्त वाढदिवसाचे पण हा वाढदिवस केक कापून जल्लोषात न करता सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यात अतिवृष्टीने झालेले नुकसान व ढेबेवाडी खोऱ्यातील स्थलांतरित लोकांची खरी गरज ओळखून धनाजी चाळके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, आपल्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत चाळके युवा मंचच्या माध्यमातून एक हात मदतीचा म्हणून जिंती जितकरवाडी येथील दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना अन्न - धान्य जीवनाश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.

गुरुवार दि.22 जुलैच्या मध्यरात्री जितकरवाडीच्या वरच्या बाजूस असणारा डोंगर कोसळला. सुदैवाने यात कसलीही हानी झाली नाही. येथील लोकांना केवळ अंगावरील कपडयानिशी बाहेर पडावे लागले. स्वतःचं राहतं घर सोडताना या लोकांना आभाळाएवढया वेदना झाल्या. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष पवार यांनी इतर प्रशासनातील सहकारी यांच्या मदतीने सुमारे 93 लोकांचे स्थलांतर जिंती येथील हायस्कूल मध्ये करण्यात आले. या लोकांना परिसरातील विविध सामाजिक संघटना, अनेक नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचे हात पुढे येत आहेत हाच धागा पकडून कुंभारगाव ता पाटण येथील चाळकेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते व साईराज को ऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई, जनकल्याण सेवाभावी ट्रस्ट मुंबईचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत चाळके यांनी आपले बंधू धनाजी चाळके यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून एक सामाजिक बाधीलकी जोपासत जिंती येथील जितकरवाडी, ढेबेवाडी येथे स्थलांतरीत झालेले धनावडेवाडी, शिंदेवाडी येथील नागरिकांना अन्न , धान्य व जीवनाश्यक वस्तूंचे किट मदत म्हणून देण्यात आले.               फुल ना फुलाची पाकळी’ या नात्याने ही मायेची मदत देण्यात आली आहे. 

यावेळी सह्याद्री बँकेचे उपाध्यक्ष सुरेश पवार, साईराज को.ऑप.क्रेडिट सोसयटी मुंबईचे व्यवस्थापक प्रशांत चाळके, शिवसेना किसननगर शाखा प्रमुख राहुल पेंढारकर, चाळकेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत चाळके, शिवसेना कामोठे शाखा प्रमुख लक्ष्मण चाळके,आनंदा चाळके, सुनिल बोरगे, राहुल चाळके, बाळू चाळके व विकी चाळके उपस्थित होते.