यंदाचा लाडक्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा साधेपणाने संपन्न


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईसह राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा ८८ वा गणेशोत्सव सोहळा असून मंडळातर्फे आज मंगळवारी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.आज पहाटे सहा वाजता जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोना निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती यावेळी या गणेशोत्सव मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी आणि अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.यंदा भाविकांना ऑनलाइन दर्शन, ऑनलाइन प्रसादाची सुविधा केली जाणार आहे. त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही.