‘स्पंदन’ ने जपली संवेदनशीलता


तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जितकरवाडी (जिंती) येथील स्थलांतरीत केलेल्या लोकांना राजगिरा लाडू, विद्याथ्र्यांना पेन, स्केच पेन असे शैक्षणिक साहित्य, साडी व लहान मुलांचे कपडे देवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य ने संवेदनशीलता जपली आहे. ‘फुल ना फुलाची पाकळी’ या नात्याने ही मायेची मदत देण्यात आली आहे. या प्रसंगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सचिव सौ.रेश्मा डाकवे, जितकरवाडी येथील ग्रामस्थ व अन्य उपस्थित होते. गुरुवार दि.22 जुलैच्या मध्यरात्री जितकरवाडीच्या वरच्या बाजूस असणारा डोंगर कोसळला. सुदैवाने यात कसलीही हानी झाली नाही. येथील लोकांना केवळ अंगावरील कपडयानिशी बाहेर पडावे लागले. स्वतःचं राहतं घर सोडताना या लोकांना आभाळाएवढया वेदना झाल्या. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष पवार यांनी इतर प्रशासनातील सहकारी यांच्या मदतीने सुमारे 93 लोकांचे स्थलांतर जिंती येथील हायस्कूल मध्ये करण्यात आले. या लोकांना विविध सामाजिक संघटना, संस्था यांनी मदत करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वीही स्पंदन ट्रस्टच्यावतीने केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 हजार, तांबवे पुरग्रस्तांसाठी एक टेम्पो जीवनावश्यक तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. याशिवाय ‘एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून मिळणारी रक्कम पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी पुरग्रस्त बांधवांना मदत करावी असे आवाहन डाॅ.डाकवे यांनी यावेळी केले.