महिला सरपंच कारभारी ! काम देखील लय भारी...! गाव केलं कोरोनामुक्त

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे गाव काही दिवसापूर्वी कोरोना हॉटस्पॉट बनले होते. गेल्या महिनाभरात कुंभारगाव गावाने कोरोना बाधित रुग्णांची शंभरी गाठली होती इतक्या मोठ्या प्रमाणात या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्क झाले होते.

संपूर्ण गाव या घटनेने हादरला कोरोनाचा वाढता फैलाव व परिस्थिती पाहता ग्रामपंचायत व कोरोना कमिटीने दहा जुलै रोजी कोरोनाला रोखण्यासाठी एकमताने आठवडाभराचा जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली. मात्र काही लोकांनी जनता कर्फ्यू ला विरोध करत नियम मोडले होते. ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घेत जे लोक या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. अशा कठीण परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने लोकांच्या सुरक्षतेसाठी विविध उपाययोजना सुरु केल्या. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा सरपंच सौ.सारिका पाटणकर यांनी आधार घेत अरोग्य विभागाच्या सहाय्याने काम सुरू केले आणि गाव कोरोना मुक्त केले. "बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही आगळीवेगळी मोहीम चालू केली. 

गेल्या महिन्याभरात शतकाकडे वाटचाल करणारे गाव आज कोरोनामुक्त झाले त्यामुळे कुंभारगावचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनी घेऊन इतर गावेही संपूर्ण कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न होणे काळाची गरज आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यश मिळवू शकतो.

सरपंच सौ.सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक जाधव‌ ,पोलीस पाटील अमित शिंदे व प्रविण मोरे, आरोग्य विभाग, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कोरोना कमिटी यांच्या संयुक्त प्रयत्नाने आज कुंभारगाव शंभर टक्के कोरोना मुक्त होत आहे. कुंभारगाव कोरोना मुक्त झाल्याने विभागातील जनतेला आनंद होत आहे. 

____________________________________
गावात इतक्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले त्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही गावात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचे पालन केले त्यामुळे गाव पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात यश आले. 
- सरपंच सौ.सारिका पाटणकर
____________________________________