अक्षर अभंग उपक्रमातून डाॅ.संदीप डाकवे यांचा वारी अनुभवण्याचा प्रयत्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

संतवचनाप्रमाणे सुखाचा सोहळा म्हणजे वारी. वारी म्हणजे अनेक गोष्टींचा मिलाफ. वारीत अनेक कलावंत आपली कला सादर करीत वारकऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. परंतू यंदाही कोरोनाच्या महामारीमुळे पंढरपूरची आषाढी वारी रदद् करण्यात आली. वाखरी येथील तिसऱ्या उभ्या रिंगणावेळी आपली कला गेली 5 वर्षापासून सादर करणाऱ्या डाॅ.संदीप डाकवे या कलावंताला देखील दुःख झाले आहे. यावेळी घरीच जड अंतःकरणाने अक्षर अभंग वारी उपक्रम राबवत विठूरायाच्या चरणी आपली कला सादर करत आहेत.

‘‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु ।।1।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोका ।।2।।
तुका म्हणजे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पुजा करु ।।3।।’’

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘आमचे घरी शब्दरुपी धन असून आमचे रत्ने आहेत. जसे रत्न चमकदार असते ते आपल्या तेजाने परिसर उजळून टाकते तसे आमचे शब्द रुप रत्ने ज्ञानरुप तेज निर्माण करते. या शब्द रुप रत्नांचीच आम्ही प्रयत्न पूर्वक शस्त्रे करु. शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहे. शब्द हे धन असून तेच आम्ही जन लोकात वाटणार आहे. शब्द हाच देव आहे अशा शब्द रुपी देवाची पूजा शब्दांनीच गौरव करुन वाटूया’’

या अभंगाच्या धर्तीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कॅलिग्राफर डाॅ.संदीप डाकवे यांनी सुलेखनातून संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाल्यापासून सोशल मिडीयावर अभंग आळवले आहेत. आषाढी एकादशीपर्यंत त्याचा हा उपक्रम सुरु राहणार आहे. अभंग लिहीत असलेल्या पेपरवर डाव्या बाजूला वार व दिनांक तर उजव्या बाजूला तिथी लिहली आहे. त्याखाली सुंदर अक्षरात अभंग लिहले आहेत. रोज एक अभंग घेवून सुलेखन करुन ते सोशल मिडीयावर पोस्ट केले जातात. वारीत प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही म्हणून ‘अक्षर अभंग वारी’ हा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला आहे.

सदर उपक्रम राबवताना डाॅ.संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड. जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे यांनी विशेष सहकार्य मिळाले आहे.

गत 5 वर्षापासून पंढरपूर वाखरी येथील उभ्या रिंगणाचा अमृतमय क्षण बघितल्यामुळे अशा पध्दतीचे वारीवर काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाल्याचे डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले. दररोज लिहलेल्या या अभंगामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

डाॅ.संदीप डाकवेंनी यापूर्वी वारीच्या अनुषंगाने राबवलेले उपक्रम : 

  • टी शर्टवर विठूरायाचे चित्र
  • मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र
  • शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन
  • 16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा
  • घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र