केंद्र शासनाच्या योजना आणि निधी बाबत पाठपुरावा करणार - खा.श्रीनिवास पाटील

 


सातारा दि.8 (जिमाका): केंद्र शासनाच्या विविध योजना व निधीबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आल्या त्या सूचना केंद्र शासनाकडे मांडून अडचणी सोडविल्या जातील, असे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी सुक्ष्म अराखडा तयार करावा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. यामध्ये तेथील गावांतील जनावरांचा समावेश करुन प्रस्ताव तयार करावा. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहिजे या हेतूने अधिकाऱ्यांनी काम करावे. याबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी.

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबीत कामे लवकरात लवकर करावी. रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीमध्ये सातारा जिल्ह्याचे चांगले काम झाले आहे. या कामांची सक्सेस स्टोरी तयार करावी. तसेच समितीच्या सदस्यांच्या सूचना असतील त्या लेखी स्वरुपात मला द्याव्यात त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे दर्जेदार करा. याबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत कामे करताना गावातील नागरिकांना विश्वासात घेवून करावीत, अशा सूचना आमदार महेश शिंदे यांनी केल्या.