नुकसान भरपाईसाठी मोरणा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडून शासनास निवेदन

 


तहसीलदारांना निवेदन देताना रंगराव जाधव, संजय हिरवे, नथुराम मोरे, शंकरराव मोरे, अशोकराव मोरे व अन्य.        
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील मोरणा विभागात प्रचंड नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. पिकांची हानी झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून सरकारने बाधित कुटुंब व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मोरणा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण मोरणा विभाग हा डोंगराळ असून दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने डोंगरावरच्या व डोंगराखालच्या गावांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. यामध्ये भूस्खलन होऊन मोरणा विभागातील आंबेघर हे गाव पूर्णतः मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे जिवीतहानी होऊन अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे भविष्यात अंबेघर सारखा धोका अनेक गावांना निर्माण झाला आहे. मोरगिरी गावठाण, आटोली, हुंबरणे, काहीर, गोकुळ, पांढरेपाणी, बाहे, पाचगणी, दिक्षी, धावडे, शिद्रुकवाडी, झाकडे, किल्ले मोरगिरी, मान्याचीवाडी, गुंजाळी, कदमवाडी, नाटोशी, कळकेवाडी, कुसरुंड, शिंदेवाडी, चव्हाणवाडी, वाडीकोतावडे (नागाचामाळ) आदी गावे धोक्याच्या टप्प्यात आली आहेत. तसेच मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेती, शेतीपंप, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विद्यूत पुरवठा करणारे खांब, रस्ते, मोऱ्या, साकव पूल यांच्यासह नदी, ओढे नाले यांच्या प्रचंड प्रवाहाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून पिडीत नागरिकांना या संकटातून बाहेर काढावे व त्यांना तातडीने मदत करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर रंगराव जाधव, संजय हिरवे, नथुराम मोरे, शंकरराव मोरे, अशोकराव मोरे, जयवंत सुर्वे, रामचंद्र गालवे, चंद्रकांत शिर्के, सीताराम मोरे, गजानन मोहळकर, नथुराम मोहिते, प्रकाश फुटाणे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.