महाराष्ट्रातील १२ टक्के जीएसटीसाठी लॉटरी विक्रेत्यांचे राज्यपालांकडे साकडे

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील लॉटरीवर क्रेंद्र सरकारने जारी केलेल्या २८ टक्के जीएसटी ऐवजी १२ टक्के करण्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांनी साकडे घातले असून या मागणीसाठी आता राज्यपालांनीच केंद्र सरकारकडे पाठपूरावा करावा, अशी विनंती ही केली आहे.महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी पदाधीकार्‍यांसह राजभवनावर नुकतेच पत्र देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.

केंद्र सरकारने लॉटरीवर लादलेल्या सरसकट २८ टक्के जीएसटी ऐवजी तो १२ टक्के करण्यात यावा. जर जीएसटी कमी करता येणे शक्य नसल्यास तो एकूण मार्जिनवर आकारण्यात यावा. जेणेकरून महाराष्ट्रसह उभ्या देशातील लॉटरी व्यवसायाला आलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा लॉटरी विक्रेत्यांचे नेते सातार्डेकर यांनी राज्यपालांकडे व्यक्त केली. आजवर या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लॉटरी विक्रेत्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे पण या पूढे सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास उग्र आंदोलनाचे हत्यार उचलावे लागेल. तसेच अन्य राज्यातील राज्यपांलाची, जीएसटी कौन्सील व केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याकरीता देशव्यापी संपर्क अभियानही सूरू करण्यात येणार असल्याची माहीती राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सातार्डेकर यांनी दिली, यावेळी संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री सुमित सातार्डेकर, शंकर सुतार (महाराज), राकेश उंबळकर, विनोद गाडेकर, अशोक नलावडे, संजय नारिंग्रेकर, जहीर शेख, संजय शेट्ये, दशरथ राऊळ आदी उपस्थित होते.