गावाच्या विकासासाठी एकजूट गरजेची : सारंग पाटील









मारूल हवेली | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून ग्रामस्थांनी सामूहिक एकजूट दाखविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

बहुले (ता.पाटण) येथे खा.श्रीनिवास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरपंच सुजाता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.



बहुले : अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी सारंग पाटील व इतर

सारंग पाटील म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील साहेब हे प्रत्येक गावाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून यापूर्वीही मोठा निधी आणता आला. त्यातून मतदार संघासाठी विविध विकासकामे करता आली. प्रत्येक गावाचा विकास करणे हा त्यांचा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर सर्वांगीण विकासाला चालना मिळते. मात्र त्यासाठी ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद व एकोपा गरजेचा आहे. परस्परांमधील हेवेदावे बाजूला करून सर्वांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहायला हवे.

    राजाभाऊ काळे म्हणाले, राष्ट्रवादीच्या माध्यमातून तळागाळात विकासाची गंगा पोहचवली जात आहे. महाविकास आघाडी सरकार हे सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने आपल्या गावाची व परिसराची प्रगती साधावी. यावेळी संपतराव पानस्कर, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, सचिन पवार, पवन पवार व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.