मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गोवंडी रेल्वे स्थानकालगतच्या बस डेपोजवळ अपघात करून पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते . मात्र मागील सहा वर्षांपासून हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता.अखेर या आरोपीला सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात गोवंडी पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे .
चुनाभट्टी परिसरात राहणारा संजय पाटणकर (३७) याने २०१५ मध्ये गोवंडी रेल्वे स्थानक परिसरातील बस डेपोजवळ अपघात करून एका पोलिसाला मारहाण केली होती.त्यानंतर तो न्यायालयात तारखांना वारंवार गैरहजर राहत असल्याने त्याला मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढून न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते .मात्र सहा वर्षांपासून हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशाने गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे आणि महिला पोलिस निरीक्षक शिरीष इडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोयंडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संपत नाळे व पोलीस हवालदार भडवळकर व पोलीस नाईक चव्हाण यांचे विशेष पथक बनवले. या पथकानेच अखेर मोठया कौशल्याने आरोपी संजय पाटणकर याला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथून अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .