सातारा जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचे उद्या एक दिवसीय काम बंद आंदोलन.






सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देताना समुदाय आरोग्य अधिकारी.    

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

अहमदनगर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा निषेध म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी एक दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत.

 तसे निवेदन सातारा जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे वतीने सातारा जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले.

 या बाबतची सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. ही आत्महत्या वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे सुसाईट नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे. डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्रातच छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली.

       डॉ. गणेश शेळके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत असा उल्लेख केला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नाहक जाचामुळे सदर डॉक्टरवर आत्महत्या करण्याची वेळ आली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी निषेध करत आहोत. असे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.    

सातारा  जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देताना समुदाय आरोग्य अधिकारी.    

तसेच महत्वाचे म्हणजे अश्या प्रकारच्या घटना ह्या आरोग्य विभागासाठी गंभीर व वेदनादायी आहे यापुढे समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यावर अशी परिस्थिती येऊ नये याची दखल शासनाने घ्यावी.

    सदरील घटनेचा व त्या घटनेला जबाबदार अधिकारी वर्गाचा आम्ही निषेध करत आहोत व या निषेधार्थ आम्ही सर्व CHO गुरूवार दि. 8 जुलै 2021 रोजी काम बंद आंदोलन करत आहोत. शासनाने आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

 सदर निवेदन देताना डॉ नितीन राठोड़,डॉ स्वप्निल सुतार,डॉ विजय लोखंडे, डॉ संग्राम ओम्बासे, नीतीश माने, डॉ दीपली पवार, डॉ अजित यादव आदी समुदाय आरोग्य अधिकारी अपस्थित होते.