योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!

महाराष्ट्राने अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांचा आदर्श घ्यावा. 



आंबेघर येथे मदत कार्यासाठी मुसळधार पाऊस व चिखलातून चालत मार्गक्रमण करताना तहसीलदार योगेश टोम्पे व गटविकास अधिकारी मीना साळुंखे.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण  तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथे भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या कुटुंबातील ग्रामस्थांना मदत मिळवून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता पुलावर आलेल्या पाण्यातून व चिखलातून मार्गक्रमण करत पाटणचे तहसीलदार योगेश टोंपे व गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. मदत करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थ, तरुणांचे मनोबल उंचावत स्वतः ही जबाबदारीने दिवसभर पावसात भिजत मदतकार्य राबविल्याने त्यांचे संपूर्ण तालुक्यातील जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे.

मोरणा विभागातील मोरणा गुरेघर धरणाच्या भिंतीच्या दक्षिण बाजूस वसलेल्या खालचे आंबेघर तर्फ पाटण येथील चार घरावर दरड कोसळली. १४ माणसे व अनेक जनावरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक पुलावरून पाणी वाहत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून पाटणचे तहसीलदार योगेश टोंपे आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसात पायी चालत जाऊन घटनास्थळी जाऊन दुर्घटनेत वाचलेल्या लोकांना धीर दिला. मदत कार्य करणे अवघड आहे, हे लक्षात आल्यावर घटनास्थळी मदतीसाठी गेलेल्या व तेथील रहिवाशांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम केले. दिवसभर मुसळधार पावसात भिजत कर्तव्य पार पाडणाऱ्या या दोन अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेला तालुकावासियांनी सलाम केला असून त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक हात तालुक्यातील विविध विभागातील दुर्घटनाग्रस्त जनतेच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

____________________________________

तहसीलदारांचे जनतेला मदतीसाठी आवाहन

मागील ४ दिवसात पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा आपल्या परीने लोकांना मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा गरजू लोकांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे. काही ठिकाणी दरड कोसळेल या भीतीने लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. अशा ठिकाणी फूड पॅकेट्स, ब्लॅंकेट, सतरंजी, रेनकोट, कपडे असे काही साहित्य लागू शकते. तरी शासकीय यंत्रणेकडून माहिती घेऊन जिथे गरज असेल तिथे, हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आपले योगदान द्यावे आणि तालुक्याला लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी सहकार्य करावे.

सगळीकडे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे याठिकाणी बेपत्ता लोकांची शोधमोहीम राबवण्यात मोठी यंत्रणा गुंतल्याने इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करता आली नाही. मात्र शक्य त्या सर्व ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तालुक्याच्या सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

आंबेघर याठिकाणी मोरगिरी, गुरेघर, शिद्रुकवाडी तसेच पाटण, कराड वरून आणि तालुक्यातून इतर ठिकाणावरून आलेल्या स्थानिक तरुणांनी प्रचंड मेहनत घेऊन भूस्खलन झालेल्या ठिकाणी बेपत्ता लोकांना शोधण्याचे अशक्यप्राय काम करून दाखवले.

मोरणेच्या मदतीच्या हाकेला कोयना धावून आली, असा हा प्रसंग आहे. आपण एकमेकांना अशी मदत करत राहिलो तर कितीही मोठी दुर्घटना घडली तरी त्यातून सावरू शकतो.

फक्त एकच विनंती करावीशी वाटते की धोक्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी वेळीच सजग राहून सुरक्षित स्थळी आसरा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही होणार नाही, आम्ही वर्षानुवर्षे इथे राहिलो आहे, असा समज करून राहिले तर धोका वाढू शकतो. सर्वांनी काळजी घ्या व मदतीसाठी पुढे या.

- योगेश टोंपे, तहसीलदार पाटण.

____________________________________