कुंभारगाव येथील जनता कर्फ्यूचा फज्जा ; बंद केलेल्या रस्त्याची कूंपने तोडून नागरिकांचा बिंदास्त वावर.

मुख्य रस्त्याचे कुंपन तोडून लोकांचा वावर सुरु. (सर्व छायाचित्र : पत्रकार राजेंद्र पुजारी)

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे त्या विभागातील मोठे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे गाव सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सदर गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची शंभरी पार झाली इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाने शिरकाव केला याच दुसऱ्या लाटेत कोरोनाने 9 ते 10 रुग्णांचा बळी घेतला.
संपूर्ण गाव या घटनेने हादरला कोरोनाचा वाढता फैलाव व परिस्थिती पाहता ग्रामपंचायत व कोरोना कमिटीने दहा जुलै रोजी कोरोनाला रोखण्यासाठी एकमताने आठवडाभराचा जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली. गावात येणारे सर्व रस्ते बंद केले त्यावर कोरोना संसर्गाचे फलक लावले. यामुळे कोरोना काही प्रमाणात रोखण्यात यश मिळेल असे गावाला वाटले पण अवघ्या चारच दिवसात या जनता कर्फ्यूचा बेफिकीर नागरिकांनी फज्जा उडवला. मात्र कोरोनाची तमा न बाळगणारे नियम न पाळणार्‍या नागरिकांनी कुंपण लावून बंद केलेले रस्ते कुंपण तोडून मोकळे केले त्यावर कहर म्हणजे त्यावरील फलक सुद्धा काढून फेकून दिले. 


कोरोना प्रतिबंधक सर्व नियम धाब्यावर बसवून बेफिकीर नागरिक मोकाट फिरू लागले काही जण मास्क न लावताच फिरत आहेत.कोरोना अधिक जोमाने वाढण्यासाठी त्यांनी जणू रस्ताच मोकळा केला. दुसऱ्या लाटेत शंभरच्यावर रुग्ण बाधित असताना व नऊ ते दहा जणांचा बळी गेल्यानंतर सुद्धा येथील नागरिकांना भिती देखील नसल्याचे चित्र पहावयास मिळाले ही शोकांतिका आहे. अशा बेफिकीर नागरिकांनी आपल्या कुटुंबाची तरी काळजी घेण्याचे भान ठेवावे. 
कोरोना प्रतिबंधक कोणतेही नियम न पाळल्याने, संस्थात्मक विलगिकरण करण्याची सोय असताना अनेक बाधित रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत राहिल्याने व बाधित रुग्णांच्या निकट सहवासातील लोक बिनधास्त गावात, बाजारपेठेत फिरत राहिल्याने गावात कोरोनाचा फैलाव वाढला व बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली त्यामुळे कोरोना रोखण्यात ग्रामपंचायत व प्रशासनाला अपयश आले. 
कोणत्याही गावात कोरोनाला रोखायचे असेल तर गावातील प्रत्येक नागरिकांचे, प्रत्येक घटकांचे सहकार्य अपेक्षित असते प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच कोरोनाला रोखता येऊ शकते. 
तालुक्यातील अनेक गावे ग्रामस्थांनी संपूर्ण सहकार्य केल्याने व कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळल्याने अल्पावधीत कोरोनामुक्त झाली आहेत याची अनेक उदाहरणे या भागातील जनतेने पाहिली आहेत. कुंभारगाव मध्ये मात्र दुर्दैवाने असे चित्र दिसत नाही ही शोकांतिका आहे‌. कोरोनाचे नियम तोडणाऱ्या, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणार्‍या नागरिकांच्या मुळे सर्व गावाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशा नागरिकांच्या वर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी बंदिस्त केलेले रस्ते मोकळे करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने, ग्रामपंचायतीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांच्या वतीने होत आहे. आता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने सतर्क राहून कायद्याचा बडगा उगारला तरच कुंभारगाव कोरोनाला रोखू शकतो अन्यथा वास्तव चित्र भयानक आहे. गावातील प्रत्येक घटकाने प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून कोरोनाचे नियम पाळणे काळाची गरज आहे तरच आपण कोरोनाला रोखू शकतो व कोरोना ची साखळी तोडू शकतो व गाव वाचू शकतो.