महामार्गाच्या विकासासाठी खासदार रस्त्यावर खा.श्रीनिवास पाटील यांनी अधिका-यांसोबत केली पाहणी .


कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

     सातारा जिल्ह्यातून जाणा-या महामार्गाच्या विकासासाठी खासदार श्रीनिवास पाटील हे मंगळवार दि. 6 रोजी थेट रस्त्यावर उतरले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिका-यांसोबत त्यांनी ठिकठिकाणी भेट देऊन महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामार्गाच्या कामात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देत कराव्या लागणा-या दुरूस्ती व बदला संदर्भात त्यांनी अधिका-यांना जागेवरच सूचना केल्या.

     शेंद्रे, सातारा ते कागल दरम्यानच्या महामार्गावरील असणा-या समस्याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिका-यांसमवेत कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी अधिका-यांना आपल्या सोबत घेऊन महामार्गाची पाहणी केली. शिवडे फाटा, उंब्रज, इंदोली फाटा याठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी कामातील त्रुटी व कराव्या लागणा-या उपाययोजना संदर्भात अधिका-यांना सूचना केल्या. खा.पाटील यांनी शिवडे फाटा येथे नियोजित उड्डाणपूलाच्या जागेची, उंब्रज येथील एस आकाराच्या धोकादायक वळणाची तसेच इंदोली फाटा येथील नियोजित उड्डाणपूलाच्या जागेची पाहणी करून अधिका-यांसमवेत चर्चा केली.



    तत्पूर्वी विश्रामगृह येथील बैठकीत खा.पाटील यांनी शेंद्रे ते कागल सहापदरीकरण मार्गात येणारे उड्डाणपूल व भुयारी मार्गावर रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सूचना केली. तसेच मार्गावरील अपघात ठिकाणी सुधारणा करण्यात याव्यात. मार्गालगतच्या सेवा रस्त्यांची आवस्था खराब होत असून त्याची दुरूस्ती करण्यात यावी. पावसाळ्यात सेवा रस्ते पाण्याखाली जात असल्याने त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उड्डाणपूलाखाली कचरा टाकला जात असल्याने नाले तुंबले जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्याठिकाणची स्वच्छता करण्यात यावी. महामार्गकडेला असलेल्या शेतात पाणी साचून राहत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अपघात प्रवण क्षेत्रातील वळणे काढून टाकावीत. सहापदरीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला देण्याची कार्यवाही करावी यासह अन्य सूचना त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने खा.श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या विकासाबाबत व अडचणींबाबत अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली. याप्रसंगी सारंग पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व्ही.डी.पंदरकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील, महादेव चौगुले, डी.डी.बारवकर, रानोज कुमार मलिक, सुधाकर कुंभोज, संजय दातार, हंबीरराव जाधव, गोपाळराव येळवे, नरेंद्र सांळुखे, अॅड.प्रमोद पुजारी, अजित जाधव आदी उपस्थित होते.

___________________________________

महामार्गावर लागणार पथदिवे
महामार्गावरील उड्डाणपूलासह आवश्यक ठिकाणी पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी खा.पाटील यांनी केल्यानंतर एनएचएआय मार्फत पथदिवे लावण्याचे अधिका-यांनी यावेळी मान्य केले. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशाने महामार्ग उजळणार आहे.