कोयनेचा विसर्ग वाढला : दरवाजे ९ फुटांवर.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गुरुवारी (दि. २९) सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट झाली असून धरणात ९०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सुमारे १५ टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे.

त्यामुळे भविष्यातील पर्जन्यमानाचा विचार करता पाणीपातळी नियंत्रण करणे आवश्यक असल्याने गुरुवारी सकाळी ११ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे ९ फुटापर्यंत उचलून धरणातून ४९ हजार ३४४ क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे मुळगाव येथील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धरणाचे ६ वक्र दरवाजे दि. २४ पासून साडेपाच फुटावर स्थिर होते. धरण भरण्यास फक्त १५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता ६ वक्रद्वारे एकूण ९ फूट उचलून सांडव्यातून ४७ हजार २४४ व पायथा विद्युत गृहाद्वारे २ हजार १०० असे एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यास प्रारंभ झाला आहे. कोयना धरण व्यवस्थापन विभागाने कोयना नदीपात्रा शेजारच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.