मला हायपर टेन्शन आणि हृदय विकार अनिल देशमुखांनी पाठवले ईडीला पत्र

 


मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आज तिसऱ्यांदा समन्स बजावून ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र देशमुख आजही ईडी चौकशीला सामोरे गेले नाहीत. त्यांनी ईडी ला दिलेल्या पत्रात आपण हायपर टेन्शन आणि हृदय विकाराने आजारी असल्याने चौकशीला हजर राहू शकत नाही, असे सांगून पुन्हा एकदा त्यांनी आजारपणाचे कारण दिले आहे.  

अनिल देशमुख यांनी ईडीच्या समन्सला उत्तर पाठविले आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीस हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाची माहिती दिली आणि कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यासही सांगितले आहे. शनिवारी ईडीने त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितले होते.

ईडीच्या समन्सला उत्तर देताना अनिल देशमुख यांच्या वतीने असे सांगितले गेले की, त्यांनी ईडीकडून जी माहिती मागितली आहे ती ईडीकडून त्यांना दिली नाही. तसेच त्यांच्यावर कोणत्या आधारावर कारवाई केली जात आहे तेही त्यांना सांगण्यात आलेले नाही. याशिवाय त्यांनी आपली प्रकृती आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण सांगत ईडीसमोर न येण्याचे कारण सांगितले आहे.त्यांनी यापूर्वीही आजारपण, वय आणि कोरोना असल्याचे कारण सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीची चौकशी करण्याची विनंती केली होती आणि आठ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. परंतु आज हा आठ दिवसांचा अतिरिक्त कालावधी आज संपला आहे.दरम्यान, अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी काल सांगितले की, अनिल देशमुख ईडीच्या कारवाईपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनिल देशमुख यांच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेत अशी मागणी केली गेली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत.