बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मनसेच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला बनलेला आणि अल्पावधीतच उतरती कळा लागलेला नाशिकचा मनसेचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे येत्या १६, १७ आणि १८ जुलैला नाशिक दौर्‍यावर जाणार आहेत.मात्र या दौऱ्याची अधिकृत माहिती पक्षाकडून देण्यात आली नसल्याने दौऱ्याचे स्वरूप काय असेल हे पदाधिकाऱ्यांनाही माहीत नाही.

या दौर्‍यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांसमवेत महत्वपूर्ण बैठका होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी कानउघाडणी कार्यक्रम होणार असल्याचे समजते.

पक्षस्थापनेपासून नाशिक मनसेचा गड राहिला आहे. शहरात तीन आमदार, महापालिकेची एकहाती सत्ता असे भरघोस यश नाशिककरांनी मनसेला दिले होते. परंतु, नेत्यांच्या हेव्यादाव्यांमुळे आणि वर्चस्ववादाच्या राजकारणामुळे अल्पकाळातच नाशिकमध्ये पक्षाला घरघर लागली. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या ४० वरून थेट पाचवर घसरली होती. स्थायी समितीवर एक सदस्य जाण्यासाठी पक्षाला अपक्षांची मदत घेण्याची वेळ आली. नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे नाशिकमध्ये चांगले काम करूनदेखील पक्षाला अपयश आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षाने उमेदवार उभे केले असले, तरी त्यांच्या पाठीशी अपेक्षित बळ लावले नाही.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली असली, तरी फारसे यश आले नाही. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आपली ताकद पुन्हा वाढवायला सुरुवात केली आहे. आता पक्षात सगळेच एकदिलाने काम करताना दिसत आहे. अनेक तरुणांना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी देखील पक्षाच्या वाढीसाठी हातभार लावणे सुरु केले आहे. पक्षातील जुने पदाधिकारी आणि अन्य पक्षातून मनसेमय झालेले पदाधिकारी यांनी हातात हात धरुन कामाला सुरुवात केली आहे. परिणामी शहरात मनसेचा जोर वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील छगन भुजबळ वगळता कुणी किंवा अन्य पक्षाचा नेता नाशकात येताना दिसत नाही. या संधीचा फायदा घेत राज यांनी येत्या १६, १७ आणि १८ जुलैला नाशिक दौरा निश्चित केला आहे.