मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार , तुळशी तलाव काठोकाठ भरले


 
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘विहार तलाव’ आज रविवारी सकाळी ९ वाजता भरुन‌‌ वाहू लागला. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत पाणी कपातीबाबत चर्चा रंगल्या होत्या. हे तलाव भरल्याने या चर्चाना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे. हे तलाव गेल्या वर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलावांपैकी हा एक आहे. काही दिवसांपूर्वीच तुळशी तलावही भरून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेद्वारे मुंबईकरांना सात तलाव आणि धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी विहार आणि तुळसी हे दोन तलाव लहान आहेत. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला, अशी माहिती जल अभियंता विभागाकडून देण्यात आली. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त पाणीसाठा असणारा हा तलाव गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.