बोगस पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची पाटण तालुका पत्रकार संघाची मागणी


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धमकावून फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. तसेच पत्रकारितेचा गंध नसणारे काहीजण बोगस ओळख पत्राचा वापर करून सर्वसामान्य जनतेचीही लुबाडणूक व फसवणूक करत आहेत. या सर्वामुळे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांची समाजात नाहक बदनामी होत आहे. या पार्श्वभूमीवर बोगस पत्रकारांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पाटण तालुका पत्रकारसंघाच्यावतीने तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय अडचणींचा आहे. मात्र येथील प्रत्येक जडणघडणीत पाटण तालुका पत्रकार संघाचे मोठे योगदान राहिले आहे. या संघातील अनेक सदस्य हे पूर्णवेळ पत्रकारिता करतात. जनतेच्या अडचणींवर आवाज उठवत त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अलिकडे काही दिवसांपासून पाटण तालुक्यात काही बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून शासकीय अधिकारी, कर्मचारी व व्यापारी, ठेकेदार यांना धमकावून फसवणूक होत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अडचणीही वाढल्या आहेत.         

 समाजात प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहे. आपण याकडे लक्ष घालून अशा बोगस पत्रकारांना वेळीच आवर घालावा. तसेच शासकीय कार्यालयांनाही आपल्याकडून याबाबत सूचित करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पाटण तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष रविंद्र माने, उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, सचिव विद्या म्हासुर्णेकर, कार्याध्यक्ष दिनकर वाईकर, राज्यप्रतिनिधी दादासाहेब पवार, विठ्ठलराव चव्हाण, शंकरराव मोहिते, विक्रांत कांबळे, निलेश साळुंखे, राजेश पाटील, सुरेश संकपाळ, राजेंद्र पवार, प्रथमेश कांबळे, श्रीगणेश गायकवाड, सीताराम पवार आदी उपस्थित होते.

 ___________________________________         
तहसिलदारांनाच बोगस पत्रकरांचा प्रत्यय

यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे म्हणाले, मला ही एक - दोन वेळा बोगस पत्रकारांचा प्रत्यय आला आहे. कोणत्यातरी अमुक-तमुक दैनिक अथवा युट्यूब चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगायचे आणि तहसीलदार कार्यालयात पत्रकार असल्याचा रुबाब दाखवायचा अशा या बोगस बहादरांचे कोणत्याच दैनिकात किंवा चैनलला स्व: कर्तृत्वावर बातमीच अद्याप दिसलेली नाही. पत्रकारितेच्या नावाखाली शासकीय कार्यालयात कोणी दलाली करत असेल तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढे येवून संबधितांची तक्रार करावी.

तहसिलदार - योगेश्वर टोंपे
___________________________________