काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.


काळगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काळगाव तालुका पाटण येथील रस्ते, पूल उखडले, शेती वाहून गेली. सलग पडणार्‍या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकांना संपर्क साधणे अवघड झाले आहे. मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने बाहेरून फोन करणार्‍या लोकांची घालमेल सुरू आहे. सकाळपासून पाऊस ओसरू लागल्याने लोकाना झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ लागला आहे. प्रचंड पावसाने लोकाना घराबाहेर पडणे देखील अवघड बनले होते. 


काळगाव पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या जोशी वाडीला पावसाचा तडाखा बसला आहे. 10 ते 12 घरे असलेल्या या छोट्या वस्तीत 50 ते 60 लोक राहतात. काल मध्यरात्री येथील घरांच्या पाठीमागे सुमारे 2 फूट तर घरांच्या पुढे साधारण 20 फुटाच्या अंतरावर मोठी चर पडली आहे त्यामूळे सुरक्षेसाठी येथील लोकाना करपेवाडी शाळेत ठेवले होते. तसेच काळगाव मधील मराठी शाळेजवळ असलेल्या एका घराला चिरा पडल्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी दुसर्‍या घरात हलवले आहे. याशिवाय काळगाव मधील पूल, भरेवाडी येथील पूल वाहतूक करण्या योग्य राहिला नाही. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 

येथील सर्व शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे . मुसळधार पावसामुळे व पुरामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने येथील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई ची मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.