जितकरवाडीजवळ कोसळली दरड

काळगांव/संदीप डाकवे

गेले दोन दिवसापासून पावसाने ढेबेवाडी, काळगांव विभागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागील बाजूस जिंती हे गांव आहे. या जिंती गावाला जोडणाऱ्या छोटयाछोटया वाडया वस्तया आहेत. जिंतीपासून साधारणपणे 2 किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, सावंतवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी ही साधारणपणे 20 घरे असलेल्या वस्त्या आहेत. या जितकरवाडीच्या वरच्या बाजूला असलेला डोंगर खाली घसरल्यामुळे येथील लोकांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे या घरांपासून काही अंतरावर दोन मोठया दरडी कोसळल्या आहेत. काल रात्रीच्या सुमारास जितकरवाडीच्या जवळच ही घटना घडली आहे. जितकरवाडी मध्ये सुमारे 30 घरे आहेत. नोकरी धंद्यानिमित्त येथील लोक मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी गेले आहेत.

तसेच या सर्व गावांना एकाच पुलावरुन जाता येते. गतवर्षी उद्घाटनापूर्वीच हा पुल वाहून गेला होता. त्यानंतर दोन्ही बाजूला भराव टाकला होता. मात्र यावर्षीदेखील पावसाने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या वाडयांचा संपर्क तुटला आहे.  

वांग मराठवाडीच्या धरणातील पाण्याचा फुगवटा देखील या गावांकडे पसरला आहे. प्रचंड पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जितकरवाडीच्या लोकांचे नशीब बलवत्तर आहे घरांपासून काही अंतरावर दरड कोसळली आहे. प्रशासनाने या गोष्टीची तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती येथील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.