पाटण तालुक्यात दमदार पावसाची हजेरी 'कोयना धरण' जुलै महिन्यात ५० टक्के भरण्याची शक्यता


पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील सर्वच विभागात पावसाने शनिवारी मध्यरात्री पासून काही प्रमाणात हजेरी लावल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक शनिवारच्या प्रमाणात दुप्पट झाली आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ४ हजार ७७४ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.२१ टीएमसीने तर पाणी उंचीत ०.०५ इंचाची वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण ४१.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास महिना अखेरपर्यंत धरण ५० टक्के पर्यंत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी पावसाने काही प्रमाणात सुरुवात केली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी विभागात पाऊस सुरू झाला आहे. धरणात सध्या सरासरी प्रतिसेकंद ४ हजार ७७४ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा ४१.७० टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३६.५८ टीएमसीआहे. पाणीउंची २०९६.०९ फुट, जलपातळी ६३९.०८ मीटर इतकी झाली आहे. शनिवारी संध्याकाळी ५ ते रविवारी संध्याकाळी ५ या चोवीस तासातील व एक जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे-कोयना २१ मिलिमीटर (९६६), नवजा ३६ मिलिमीटर, (१२१०), महाबळेश्वर १० मिलिमीटर (१३२५) पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला असून शेतीच्या उर्वरित कामांची घाई सुरू झाली आहे.